सासवडमध्ये 29 जानेवारीला भव्य भजन स्पर्धेचे आयोजन

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) – सहकार महर्षी स्व. चंदूकाका जगताप यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त सासवड येथील संत सोपानकाका महाराजांच्या संजीवन समाधी मंदिराच्या प्रांगणात दि. २९ व ३० जानेवारीला भव्य भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सासवड सांस्कृतिक मंडळ, सासवड आणि बोपगाव भजनी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली. पुरंदर – हवेली मतदारसंघातील गावागावांतील भजनी मंडळांनी या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या स्पर्धेतील प्रथम ५ विजेत्या संघांना अनुक्रमे ११ हजार, ९ हजार, ७ हजार, ५ हजार आणि ३ हजार रुपयांची रक्कम, तसेच या सर्व विजेत्यांना डग्गा व तबला बक्षीस देण्यात येईल, तर स्पर्धेत सहभागी सर्व भजनी मंडळांनाही उत्तेजनार्थ डग्गा व तबला देण्यात येणार आहे.

दि. २९ रोजी सकाळी स्पर्धांचे उद्घाटन, तर दि. ३० जानेवारीला सायंकाळी बक्षीस वितरण होणार असून या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भजनी मंडळांनी पुरंदरमधील बोपगाव भजनी मंडळ तसेच सासवड येथील श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ व संस्थेच्या सर्व शाखा येथे संपर्क साधण्याचे आवाहन आमदार संजय जगताप तसेच सासवड आणि बोपगाव भजनी मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे .