जेजुरी : पुरंदरच्या आमसभेत जनतेकडून प्रश्नांचे ‘डोंगर’

जेजुरी (संदीप झगडे) : पोलीसनामा ऑनलाइन – सासवड येथील आचार्य अत्रे सांस्कृतिक भवनात सोमवारी ( दि . ६ ) पुरंदरची आमसभा झाली . सभेत जनतेतून प्रश्नांचा पाऊस पडला मुख्यत्वे विद्युत मंडळ आणि स्थानिक पातळीवर महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या कामाबाबत नागरिकांनी तीव्र नापसंती व्यक्त केली.

पुणे जिल्हा परिषद, पंचायत समिती पुरंदर यांनी आमदार संजय जगताप यांच्या सूचनेप्रमाणे या आमसभेचे आयोजन केले, शासनाच्या अधिकाऱ्यांकडून कामकाजाचा आढावा घेण्यात आला व त्यानंतर नागरिकांना मत मांडण्याची संधी देण्यात आली. याप्रसंगी माजी आमदार अशोक टेकवडे, पं.स . च्या सभापती नलिनी हरी लोळे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते विजय कोलते तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रदीप पोमण राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष माणिक झेंडे पाटील, जिल्हा परिषद सदस्य दत्ता झुरंगे, शालिनी पवार, ज्योती झेंडे उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड, तहसीलदार रूपाली सरनोबत, सासवडचे नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, जेजुरीच्या नगराध्यक्षा वीणा सोनवणे, पं . स . सदस्या सुनीता कोलते सोनाली यादव, दत्ता काळे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुदाम इंगळे, हेमंत माहूरकर उपनगरध्यक्षा निर्मला जगताप, तसेच सासवड व जेजुरी नगरपालिकांचे सर्व सदस्य, विविध गावांचे सरपंच, सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सभेमध्ये प्रामुख्याने विद्युत विभागाच्या भोंगळ कारभाराचा विषय गाजला . चुकीच्या पद्धतीने होणारी विजेची आकारणी , कृषी पंपांच्या वीजबिलाबाबतचे प्रश्न , लोडशेडिंगच्या वेळा याबाबत नागरिकांनी प्रश्न मांडले. शेतीपंपाला दिवसाच्या वेळी १२ तासांऐवजी ८ तास वीज देण्याची तसेच कृषी पंपांची वीजबिले माफ करण्याची मागणी प्रामुख्याने पुढे आली.

आमदार संजय जगताप यांनी जनतेचे प्रश्न कमी करण्यासाठी दर तीन किंवा सहा महिन्यांनी शासन आपल्या दारी कार्यक्रम घेणे, शेतीसाठी दिवसा वीज देण्यासाठी नियोजन करणे, शेतकऱ्यांसाठीच्या सर्व योजनांचा लाभ तळापर्यंत मिळण्यासाठी प्रयत्न करणे , सर्व बांधकाम विभागांनी टेंडरप्रमाणे काम करणे, निधीचा एक रुपयाही परत जाता काम नये, खासदार फंडातील कामे त्वरेने सुरू करा, याबाबत संबंधित विभागांना सूचना केल्या.

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी विधिमंडळात अधिक निधीसाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगत पुरंदरमध्ये भूजल सर्वेक्षण पुन्हा करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. महाविकास आघाडीच्या धोरणाप्रमाणे एमआयडीसीमध्ये स्थानिकाना ८० टक्के प्राधान्य मिळणार असल्याचेही ते म्हणाले. केंद्रप्रमुख राजेंद्र जगताप यांनी सूत्रसंचालन, गटविकास अधिकारी प्रमोद काळे यांनी प्रास्ताविक केले, तर उपसभापती गोरक्षनाथ माने यांनी आभार मानले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/