जेजुरी शहराची चालूवर्षाची घरपट्टी माफ करावी याबाबत नगरपालिकेचा ठराव : नगरध्यक्षा वीणा सोनवणे

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडोबा देवाच्या जेजुरी नगरीत लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून नागरिकांचे उपजीविकेचे साधन बंद झाले आहे. त्यामुळे नागरिकांची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. जेजुरी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत चालू वर्षाची नागरिकांची घरपट्टी शासनाने रद्द करावी असा ठराव जेजुरी पालिकेत करण्यात आला असून सदर प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याचे जेजुरी नगरपालिकेच्या नगरध्यक्षा वीणा सोनवणे तसेच उपनगराध्यक्ष गणेश निकुडे यांनी सांगितले.

जेजुरी नगरपालिकेत आज दि २९ रोजी सर्वसाधारण सभा घेण्यात आली. सभेमध्ये कोव्हीड १९ संदर्भात उपाययोजना करणे, रस्ता अनुदाना अंतर्गत रस्त्यावरील ठापे,नाल्याची डागडुजी करणे,नागरिकांच्या मागणीनुसार विविध प्रभागात कामे करणे,तसेच नवीन पाण्याचे टँकर , मैलागाडी, मोबाईल टोयलेट खरेदी करणे या बाबत मंजुरी देण्यात आली तसेच विविध विकास कामांना लॉकडाऊनमुळे मुदत वाढ देण्यात आली.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जेजुरी शहरात लॉकडाऊन जाहीर झाल्या पासून गेली तीन महिने सर्व व्यवसाय बंद आहेत. जेजुरीचा खंडोबा हा महाराष्ट्राचे कुलदैवत असून खंडोबा देवाच्या देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या अनुषंगाने होणारा व्यवसाय व व्यापार यावरच जेजुरीकर नागरिक व शहराची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. गेली तीन महिन्यांपासून जेजुरी गडावरील खंडोबा मंदिर बंद असून भाविकांवर अवलंबून असणाऱ्या ९० टक्के नागरिकांचे व्यवसाय बंद आहेत तसेच आणखी पुढील काळात हि मंदिर उघडण्याची शक्यता कमी आहे.

त्यामुळे जेजुरी शहरातील मालमत्ताधारकांची घरपट्टी शासनाने माफ करावी असा ठराव पालिकेत नगरध्यक्षा व उपनगराध्यक्ष यांनी मांडला.सर्व नगरसेवकांनी या ठरावाला मान्यता दिली.हा करमाफीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याचे नगराध्यक्षा वीणा सोनवणे यांनी सांगितले.

या सभेत जेजुरी पालिकेचे विरोधीपक्ष नेते जयदीप बारभाई यांनी कोव्हीड १९ च्या केलेल्या उपाययोजनेबाबत नगरध्यक्षा ,मुख्याधिकारी व सर्व अधिकारी कर्मचारी यांचे अभिनंदन केले. यावेळी मुख्याधिकारी पूनम कदम व सर्व नगरसेवक उपस्थित होते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like