जेजुरीत सोमवारी सोमवती यात्रा भरणार

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) – श्री. क्षेत्र जेजुरीत सोमवारी (ता. २८) खंडोबाची सोमवती यात्रा भरणार आहे. सोमवती यात्रेसाठी मध्यरात्री तीन वाजता पालखीचे प्रस्थान होणार असून, सकाळी सातच्या सुमारास कऱ्हा नदीवर सोमवती स्नानाचा कार्यक्रम होणार आहे. सोमवती यात्रेच्या नियोजनासाठी छत्री मंदिरावर ग्रामस्थांची बैठक झाली.

या प्रसंगी मुख्य मानकरी राजेंद्र पेशवे, देव संस्थानचे मुख्य विश्वस्त, अ‍ॅड. अशोक संकपाळ, विश्वस्त राजकुमार लोढा, शिवराज झगडे, संदीप जगताप, सहायक पोलिस निरीक्षक अंकुश माने, खांदेकरीमानकरी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष गणेश आगलावे, माजी विश्वस्त सुधीर गोडसे, वेदमूर्ती शशिकांत सेवेकरी, अरुण खोमणे, जालिंदर खोमणे, आबा राऊत, कृष्णा कुदळे आदी उपस्थित होते.

सोमवारी सकाळी ९ वाजून २ मिनिटांपर्यंत अमावास्या असल्याने यात्रा भरणार असल्याचे या वेळी जाहीर करण्यात आले. अमावास्या संपण्यापूर्वी सोमवती स्नान होणे आवश्यक असल्याने मध्यरात्री तीन वाजता पालखीचे प्रस्थान होणार असल्याचे राजेंद्र पेशवे यांनी जाहीर केले.

साधारण सकाळी सातच्या सुमारास कऱ्हा नदीवर स्नानाचा कार्यक्रम होणार आहे. देव संस्थानच्या वतीने जागोजागी रस्त्याची दुरुस्ती, जागोजागी विजेची सोय करण्यात येणार आहे. खांदेकरी मानकरी यांना धालेवाडी परिसरात अल्पोपाहाराची सोयही करण्यात येणार आहे.

Visit : policenama.com