देशावरील ‘कोरोना’चे संकट दूर व्हावे यासाठी जेजुरी गडावर ‘पारायण’ व ‘जलाभिषेक’

जेजुरी (संदीप झगडे) : संपूर्ण जगावर कोरोनाचे महाभयंकर संकट ओढवले आहे . हे संकट लवकर दूर व्हावे , यासाठी भाविकांनी महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबा देवाला साकडे घातले आहे . यानिमित्त खंडोबा मंदिरात ‘मार्तंड विजय’ ग्रंथाचे पारायण व देवाला जलाभिषेक करण्यात आला आहे . जेजुरी येथील खंडोबा देवाचे पुजारी सेवक , श्री मार्तंड देवसंस्थान , श्री खंडोबा पालखी सोहळा समिती मानकरी , खांदेकरी व ग्रामस्थ यांच्या वतीने मंगळवार ( दि . ३१ ) पासून जेजुरी गडावरील खंडोबा मंदिरात हा उपक्रम राबविण्यात आला आहे .

यात श्री मार्तंड विजय ग्रंथाचे पारायण आणि श्री खंडोबा व म्हाळसादेवीच्या स्वयंभू लिंगावर जलाभिषेक , रुद्राभिषेक आवर्तने सुरू करण्यात आले आहे . पुजारी सेवक वर्गाचे चेतन सातभाई हे रविवारपर्यंत श्री मार्तंड विजय ग्रंथाचे पारायण , तर वेदमूर्ती शशिकांत सेवेकरी हे जलाभिषेक व रुद्राभिषेकाचे पौरोहित्य करीत आहेत . दुग्ध , भंडारा , शर्करा , बेलपत्र आदींचा अभिषेक घालण्यात येणार असल्याचे श्री खंडोबा पालखी सोहळा समितीचे अध्यक्ष गणेश आगलावे यांनी सांगितले .