विनापरवाना बाहेर जिल्ह्यातून आलेल्या व्यक्तींवर जेजुरी पोलिसांची कारवाई

जेजुरी : पुणे जिल्हाधिकारी यांनी कोरोना या संसर्गजन्य रोगाचा प्रसार रोखण्यासाठी पुणे जिल्ह्यामध्ये संचारबंदीचे आदेश दिले आहेत. तसेच पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक यांनी संचारबंदीचा भंग करणाऱ्यांवर कडक कारवाईच्या सूचना दिल्या आहेत .त्यानुसार विनापरवाना बाहेर जिल्ह्यातून आलेल्या व्यक्तींवर जेजुरी पोलिसांनी कारवाई केली असल्याचे जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांनी सांगितले.

याबाबत माहिती अशी कि दि २३ रोजी दुपारी साडेबारा वाजता एक टाटा सुमो टेम्पो जेजुरी मोरगाव चौकात पोलिसांनी अडविला .या टेम्पोतील चालक मह्फुज झाकीर हुसेन वय ३२ रा. चेंबूर ,मुंबई याने सुरेखा प्रमोद कांबळे वय ४७ व आकाश प्रमोद कांबळे वय २० रा, वरळी मुंबई, यांना घेवून मुंबईतून विनापरवाना,प्रवास परवाना न घेता प्रवास केला . सदर व्यक्तींना पुरंदर तालुक्यातील पिंगोरी येथे जायचे होते.  या व्यक्तींनी कोणतीही पूर्व परवनागी न घेता संचारबंदी व शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करून मुंबई ते जेजुरी असा प्रवास केल्याने तसेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याचे शासनाच्या मोहिमेमध्ये हयगयीचे वर्तन केल्याने  या तिघां विरोधात भा.द.वी कलम १८८,२६९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच सुरेखा कांबळे व आकाश कांबळे यांना कवडेवाडी येथील प्राथमिक शाळेत कोरंटाइन करण्यात आले आहे. यापुढे  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशांचे उल्लंघन करून कोणीही जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीत बेकायदेशीर रित्या प्रवेश करू नये अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल असे जेजुरी पोलिसांनी आवाहन केले आहे.