जेजुरी कडेपठार मंदिर ट्रस्ट कडुन भाविकांसाठी ‘कोरोना’ बद्दल जनजागृती फलक

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) – महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या कडेपठार मंदिर (जुना गड) परिसरात कोरोना बद्दल जनजागृती फलक जारी केले. आज दि १६ मार्च २०२० रोजी कडेपठार ट्रस्ट द्वारे सध्या जगभरात चालू असलेली कोरोना विषाणू संबंधीत जनजागृती आणि काळजी घेण्यासाठी पायरी मार्ग ते मंदिर परिसरात कोरोना विषाणू बद्दल फलक लावण्यात आले. जेजुरीला खंडोबा मंदिरात दर्शनसाठी येणारे भाविक भक्त हे महाराष्ट्र राज्य तसेच राज्याबाहेरून येत असतात. भाविकांच्या माहितीसाठी व योग्य दक्षता घेण्यासाठी हे फलक लावण्यात आले अशी माहिती ट्रस्टी रामचंद्र दिडभाई यांनी दिली. या मोहीमे साठी सर्व कर्मचारी वर्गाला मास्कचे वाटप करण्यात आले आणि सॅनिटायजर देण्यात आले.

मंदिरात दर्शनासाठी जाताना हातावर सॅनिटायजर टाकून प्रवेश दिला जाणार आहे. तसेच कोरोनाबाबत इतर काळजी घेण्यात येणार आहे. कोणत्याही प्रकारची अफवा पसरवू नये अशी सूचना सर्व कर्मचारी वर्ग व पुजारी वर्गाला कडेपठारचे सचिव सदानंद बारभाई यांनी दिली. या कार्यक्रमाची सुरुवात कडेपठार पायथा पासून केली. या प्रसांगी ट्रस्टी दिडभाई, सचिव बारभाई, कर्मचारी वर्गातून सचिन शेवाळे, दीपक खोमणे, सुनील खोमणे, बाळासाहेब झगडे, रोहिदास खोमणे, धनंजय नाकाडे, पुजारी अरुण कदम, राजेंद्र गोडसे, गणेश दरेकर उपस्थित होते.

तसेच मंदिर बंद संबंधीत कोणताही निर्णय अधिकृत जारी केल्याशिवाय घेतला जाणार नाही. कोणीही कसल्याही प्रकारची अफवा पसरवू नये असे सचिव बारभाई यांनी या प्रसंगी सांगितले.