पर्यटकांसाठी खुशखबर ! जेजुरी कडेपठार (जुना गड) पायथा ते मंदिरापर्यंत होणार ‘रोप – वे’

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) –  अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री क्षेत्र खंडोबाच्या मूळ स्थानी कडेपठरावर गडावर ( जुना गड ) भाविकांना आता विनासायास जाता येणार आहे. येत्या दीड वर्षात कडेपठार पायथा ते मंदिरापर्यंत रोप – वे ( स्वयंचलित पाळणा ) प्रकल्प उभा राहणार आहे. ज्यांना पायांवरून पायी चालत गडावर जाता येत नाही. अशा वयोवृद्ध व इच्छुक भाविकांना आता या ‘रोप – वे ‘ मधून जाउन दर्शन घेता येणे शक्य होणार आहे.

श्री क्षेत्र जेजुरीचा खंडोबा हे संपूर्ण महाराष्ट्रातील भाविकांचे आराध्यदेवत आहे. येथे दरवर्षी सुमारे दहा लाख भाविक भेट देतात. सोमवती अमावास्या, चंपाषष्टी, चैत्र, माघ, पौष पौर्णिमा, नवरात्री व दसरा या प्रत्येक सणाला जेजुरी गटावर किमान दोन लाख भाविक येतात. जेजुरी गडाच्या नैऋत्य दिशेला कडेपठार हे देवस्थान आहे. ते खंडेरायाच्या अवताराचे मूळ स्थान असून, येथे मंदिर आहे.हे ठिकाण समुद्रसपाटीपासून सुमारे एक हजार मीटर ( एक किमी ) तर जेजुरी गावापासून ४०० मीटर उंच आहे.

कडेपठारावर जाण्यासाठी जेजुरी गड व पायथा येथून दोन मार्ग आहेत. पायथ्यापासून जाण्यासाठी ७५० पायऱ्या असून पायथ्यापासून सुमारे दीड किलोमीटर अंतर आहे. वयोवृद्ध भाविक, बालके, गरोदर महिला यांना इच्छा असूनही कडेपठार उंचावर असल्याने त्यांना पायऱ्यांवरून जाता येत नाही. त्यांनादेखील गडावर जाता यावे यासाठी रोप – वे प्रकल्प उभा करण्याची संकल्पना धर्मादाय सह आयुक्त दलीप देशमुख यांनी मांडली.

त्यानुसार कंपन्यांकडून टेंडर ही मागविण्यात आले आणि त्यापैकी एका खासगी कंपनीचे टेंडर मंजूर करून त्यांना काम करण्याची ऑर्डरदखील देण्यात आली आहे. ही सुविधा ‘बांधा – वापरा आणि हस्तांतरित करा’ ( बीओटी ) तत्त्वावर सुरू करण्यात येणार आहे. यासाठी तिकीट असणार असून, किती शुल्क आकारायचे हे प्रकल्प उभा करणारी कंपनी ठरवणार आहे.

येत्या दोन वर्षात हा प्रकल्प उभा राहणार आहे. त्यामुळे वयोवृद्ध व इच्छुक भाविकांना स:शुल्क गडावर जाता येणार आहे . प्रकल्पचालकाकडून प्रत्येक महिन्याला खंडोबा देवस्थानला एक लाख रुपये उत्पन्नदेखील मिळणार आहे. हे उत्पन्न भाविकांना सुविधा देण्यासाठी वापरण्यात येईल. – दिलीप देशमुख , सहधर्मादाय आयुक्त

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/