जेजुरीच्या पालखी तळावर चित्रपट अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते वटवृक्षाचे रोपण

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) – आळंदी देवसंस्थांन आणि सयाजी शिंदे यांच्या सह्याद्री देवराई संस्थेच्या वतीने आळंदी ते पंढरपूर मार्गावरील पालखी सोहळ्याची मुक्कामाच्या ठिकाणी पालखी तळावर वृक्षारोपण अभियान हाती घेण्यात आले आहे. रविवार दि 21 रोजी जेजुरी नगरीत जुन्या पालखी तळावर प्रसिद्ध चित्रपट अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते वटवृक्ष लावण्यात आले.

या वेळी आळंदी देवसंस्थांचे प्रमुख विश्वस्त ॲड. विकास ढगे, देहू संस्थानचे मधुकर मोरे, पंढरपूर देवसंस्थांनचे शिवाजी मोरे, विश्वस्त अनिल मोरे, जेजुरी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा वीणा सोनावणे, मुख्याधिकारी पूनम कदम, नगरसेवक सचिन सोनावणे, गणेश शिंदे, रुक्मिणी जगताप, माजी नगरसेवक हेमंत सोनवणे, पालिकेचे अधिकारी राजेंद्र गाढवे, बाळासाहेब बगाडे तसेच वृक्षमित्र अनिल पोकळे आदी यावेळी उपस्थित होते .

परंपरेने सुरु असलेला वारकरी संप्रदायचा पायी, पालखी सोहळा कोरोनाच्या संकटामुळे या वर्षी होऊ शकला नाही. तरी देखील या सोहळ्यात मनापासून सहभागी होण्यासाठी आपल्या गावात,मंदीर परिसरात देवाच्या, संतांच्या नावाने आषाढी एकादशीला झाडे लावून त्याभोवती प्रदक्षिणा घालून पांडुरंगाची आराधना करा असे आवाहन देहू संस्थान प्रमुख विश्वस्त मधुकर मोरे यांनी केले. जेजुरी पालिकेच्या वतीने नगराध्यक्षा वीणा सोनावणे यांनी सर्वांचे आभार मानले.