जेजुरी : श्री मार्तंड देवसंस्थानच्या वतीने ससून हॉस्पिटलच्या आयसोलेशन वॉर्डसाठी 51 लाखांची मदत

जेजुरी (संदीप झगडे) : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसच्या उपचारासाठी पुणे ससून हॉस्पिटल येथे सेपरेट आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात येत आहे . त्यासाठी जेजुरीच्या श्री मार्तंड देवसंस्थानच्या वतीने ५१ लाख रुपये देणगी जाहीर करण्यात आली आहे ,अशी माहिती देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त संदीप जगताप यांनी दिली .

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचे मोठे संकट जगावर आहे . देशभर लॉकडाऊन करूनही बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. यावर उपचारासाठी पुणे येथील ससून रुग्णालयात आयसोलेशन वॉर्ड तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या वॉर्डमध्ये व्हेंटिलेटर खरेदीसाठी पुणे धर्मादाय आयुक्त कार्यलयाचे सहधर्मादाय आयुक्त दिलीपकुमार देशमुख यांच्या सुचनेनुसार सर्व विश्वस्त मंडळाने निर्णय घेऊन ५१ लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे प्रमुख विश्वस्त संदीप जगताप यांनी सांगितले .