वन्यजीवांची तहान भागविण्यासाठी नवविवाहित जोडप्याची मदत

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन ( संदीप झगडे) – जेजुरी जयाद्री डोंगर खोऱ्यात मोठ्या प्रमाणात वनसंपदा वाढत असून येथे वन्य श्वापदांचे अस्तिव दिसून येत आहे. उन्हाळ्यात या वन्यजीवांना पाणी आणि चारा मिळावा यासाठी जयमल्हार फौंडेशन काम करीत आहे. एक सामाजिक बांधिलकीच्या नात्याने या वन्यजीवाची तहान भागविण्यासाठी जेजुरी परिसरातील एका नवविवाहित जोडप्याने मदतीचा हात पुढे केला आहे.

जेजुरी गड, कडेपठार गड (जयाद्री परिसर ) या परिसरातील डोंगर रांगेत वनविभागाने मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केल्याने,तसेच पाणवठे निर्माण केल्याने गेली पाच सहा वर्षात जयाद्री डोंगर रांगेच्या परिसरात वन्यपशु पक्षी दिसू लागले आहेत. गेली सहा वर्षांपासून या वन्यजीवांना पाणी व चारा उपलब्ध व्हावा यासाठी जयमल्हार फौंडेशन स्थापन करण्यात आले आहे. प्रत्येक उन्हाळ्यात पाणवठ्यात पाणी आणि चारा ठेवण्याचे काम हि संस्था करते यासाठी अनेक तरुण आर्थिक मदत करत असतात.

रविवार दि २४ रोजी पुरंदर तालुक्यातील रानमळा येथे ज्योती कुदळे व वाल्हे येथील सुरेश भुजबळ यांचा विवाह सोशल डीस्टटिंग पाळत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत साध्या पद्धतीने पार पडला .यावेळी या नवविवाहित जोडप्याने काही रक्कम वन्यजीवांची तहान भागविण्यासाठी जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांच्याकडे सुपूर्द केली. जयमल्हार फौंडेशनकडे हि रक्कम देण्यात आली. फौंडेशनचे प्रमुख विशाल बारभाई यांनी या नवविवाहित जोडप्यांचे आभार मानले.

जेजुरी कडेपठार पायथा परिसरात सुमारे दहा पाणवठे असून त्यातील काही पाणवठे लिक असल्याने त्यात पाणी टिकत नाही य पानावठ्यांची दुरुस्ती व्हावी अशी मागणी विशाल बारभाई यांनी वनविभागाकडे केली आहे. पुरंदर वनविभागाच्या वनक्षेत्र अधिकारी जयश्री जाधव यांनी सर्व पाणवठ्याची पाहणी करून जे पाणवठे लिक आहेत त्याठिकाणी तातडीने काम सुरु करणार असल्याचे सांगितले.