जेजुरी नगरपालिकेच्या माध्यमातून शरद भोजन योजनेचे धान्य वाटप : मुख्याधिकारी पूनम कदम

जेजुरी : जेजुरी शहरात राहणाऱ्या मात्र ज्या नागरिकांना येथील रेशनिंग कार्ड नाही अशा व्यक्तींची नोंदणी जेजुरी पालिकेने केली होती. अशा व्यक्तींना पुणे जिल्हा परिषदेच्या शरद भोजन योजनेतून जेजुरी पालिकेच्या माध्यमातून गहु आणि तांदुळाचे वाटप करण्यात आले असल्याचे जेजुरी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पूनम कदम यांनी सांगितले.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि लांबलेले लोकडाऊन यामुळे सर्वसामान्य नागरिकांची उपासमार होवू नये यासाठी शासन पातळीवर उपाययोजना सुरु आहेत. जेजुरी हे तीर्थक्षेत्र आणि औद्योगिक क्षेत्र असल्याने शहरात उपजीविकेसाठी आलेले मजूर, परप्रांतीयांची संख्या मोठी आहे. या नागरिकांकडे येथील रेशनिंग कार्ड नसल्याने पहिल्या टप्प्यात यांना धान्य मिळू शकले नाही . जेजुरी शहरात राहणाऱ्या मात्र ज्यांच्याकडे रेशनिंग कार्ड नाही अशा १२०९ कुटुंबातील ३५०० नागरिकांची नोंदणी जेजुरी पालिकेने केली होती.

या नागरिकांना सोशल डीस्टटिंग ठेवून बुधवार दि २७ रोजी जेजुरी येथील जयमल्हार सांस्कृतिक भवनात जेजुरी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा वीणा सोनवणे व मुख्याधिकारी पूनम शिंदे यांच्या हस्ते धान्य वाटप करण्यात आले. प्रत्येक व्यक्तीला १३ रुपयात तीन किलो तांदूळ व दोन किलो गव्हू असे पाच किलो धान्य वाटप करण्यात आले. एकूण सतरा टन धान्य वाटपासाठी आले आहे. जेजुरी पालिकेचे अधिकारी राजेंद्र गाढवे,बाळासाहेब खोमणे,कन्हैया लाखे, प्रसाद जगताप, बाळासाहेब बगाडे, संगीता येलमेवार , वंदना चीव्हे तसेच कर्मचारी व शिक्षकांनी या वाटपाचे नियोजन केले होते.