काय सांगता ! होय, स्वत:चंच ‘वीर्य’ वापरून महिला होणार ‘आई’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – गुजरातमधील एक महिला आता स्वत:च्याच गोठवलेल्या वीर्यातून आई होण्याच्या तयारीला लागली आहे. डॉ जेसनूर दायारा असं या महिलेचं नाव आहे. खुद्द जेसनूरनं याबाबत माहिती दिली आहे.

एका इंग्रजी वृत्तानुसार, डॉ जेसनूर दायारा ही महिला गुजरातमधील पहिली ट्रान्सवुमन (लिंगबदल केलेली) डॉक्टर आहे. रशियामधून तिनं आपलं वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं आहे. ती मूळची पंचमहलच्या गोध्रा या गावची आहे. तिनं तिचं बालपण एक मुलगा म्हणून व्यतीत केलं आहे.

जेसनूर सांगते की, लहानपणापासूनच तिला एका पुरुषाच्या शरीरात अडकून पडल्यासारखं वाटत होतं. ती लहान असतानाच आईची साडी नेसणं, मेकअप करणं अशा गोष्टी करायची. शिक्षणासाठी जेव्हा ती परदेशी गेली तेव्हा मात्र तिनं स्त्री होण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला होणारा विरोध मावळून तिच्या कुटुंबीयांनी आणि मग समाजानंही तिचा स्विकार केला.

सध्या जेसनूर मेडिकल काऊंसिलच्या परीक्षेची तयारी करत आहे. परीक्षेनंतर तिच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. यानंतर ती एक महिला म्हणून समाजात वावरू शकणार आहे. परंतु त्यापूर्वीच तिनं एक निर्णय घेतला आहे. तिला महिला झाल्यानंतर आई होण्याची इच्छा आहे. यासाठी तिनं आधीच स्वत:चं वीर्य गोठवण्यासाठी दिलं आहे.

आणंद येथील एका फर्टीलिटी क्लिनिकमध्ये ही प्रक्रिया पार पाडण्यात आली. स्त्रीबीज आणि गर्भाशयाच्या मदतीनं तिला आई होणं अन् मूल जन्माला घालणं शक्य होणार आहे. परंतु यासाठी तिला सरोगसी हा पर्याय निवडावा लागणार आहे हेही तितकंच खरं आहे. परंतु यासाठी काहीशी अडचण दिसत आहे.

लोकसभा 2019 मध्ये सरोगेसी कायद्यासंबंधी एक विधेयक मंजूर करण्यात आलं. त्यात अविवाहित पुरुष, एलजीबीटीक्यु जोडपं किंवा लिव्ह इन नात्यातील जोडप्याला सरोगसीसाठी परवानगी देण्यात आलेली नाही. अद्याप हे विधेयक राज्यसभा आणि राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी प्रलंबित आहे. त्यामुळं जेसनूरला सरोगसीसाठी देशाबाहेरचे पर्याय निवडावे लागणार आहेत. मात्र आई होण्याची तिची हेही करण्याची तयारी आहे असं ती म्हणते.