Jet Airways : ‘जेट’ वरील आर्थिक संकट गडद ; ‘त्या’ 4 विमानांना ब्रेक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जेट एअरवेज या विमान कंपनीनं भाडं चुकतं न केल्याने भाडेपट्ट्यावर घेतलेल्या चार विमानांना ब्रेक लावण्यात आल्याचं समजत आहे. याचे कारण म्हणजे जेट एअरवेज या विमान कंपनीवरील आर्थिक संकट अधिक गडद झालं आहे. त्यामुळेच या विमानांना ब्रेक लावण्यात आला आहे. याचा परिणाम म्हणजे सोमवार रात्रीपासून आतापर्यंत जेटची किमान २० उड्डाणं रद्द करावी लागली आहेत असेही समोर आले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली, मुंबई, बेंगळुरू आणि चेन्नई विमानतळावर जेटच्या ताफ्यातील बोईंग ७३७ विमानं थांबवून ठेवण्यात आली आहेत. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, चारही विमानतळावर प्रत्येकी एक विमान थांबवण्यात आलं आहे. विमानांच्या मूळ मालकांनी विमानं ताब्यात घेण्याचे पाऊल उचलल्याचेही सांगितले जात आहे.

मुख्य म्हणजे जेट एअरवेजने या संकटातून मार्ग काढण्यासाठी विविध कंपन्या व वित्तसंस्थांशी संपर्क साधला असला तरी प्रत्यक्ष देणी चुकती केल्यानंतरच यातून मार्ग काढता येणार आहे हेही तितकेच खरे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रोखीची चणचण असल्याने काही विमानांचे उड्डाण थांबवावे लागले आहे, असे कंपनीच्या वेबसाइटवर नमूद करण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जेटच्या ताफ्यात १२३ विमानं आहेत. परंतु यातील किती विमानं सध्या प्रत्यक्ष सेवेत आहेत, हे कंपनीकडून अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नाही.