डासांमुळे विमान एक तास उडालेच नाही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आजपर्यंत उंदीर, साप असल्याने विमान उड्डाणाला उशीर झाल्याचे ऐकले आहे. मात्र विमान उड्डाणाला डासांच्या त्रासामुळे एक तास उशीर झाला असल्याचे वृत्त आले आहे.

मुंबईहून दिल्लीला उड्डाण करणाऱ्या एका विमानात प्रवाशांचे स्वागत डासांनी केले. हे डास एवढ्या प्रमाणात होते की जाग्यावर बसल्यावरही प्रवाशांना त्याचा त्रास होऊ लागला. त्यामुळे याची माहिती प्रवाशांनी कर्मचाऱ्यांना दिली. त्यावेळी विमानात डास मारण्याचे औषध फवारण्यात आले. तरिही डास काही कमी झाले नाहीत. दरम्यान कर्मचाऱ्यांनी चक्क डास मारण्याची इलेक्ट्रिक रॅकेट हाती घेऊन विमानात प्रवेश केला. त्यावेळी बऱ्यापैकी डासांचा नायनाट झाला.

विशेष म्हणजे, विमानातील ही डास मारण्यासाठी तब्बल एक तास लागला. त्यामुळे विमानाला मुंबईहून दिल्ली मार्गे उड्डाण करण्यासाठी एकतासाचा उशीर झाला. डासांमुळे विमानाला एक तास उशिरा उड्डाण करावे लागले हे इतिहासातील पहिलेच उदाहरण असल्याचे म्हंटले जात आहे.