राम जेठमलानी लढले आहेत हाजी मस्तान ते बाबा रामदेव पर्यंतचे ‘हे’ खटले !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – माजी कायदामंत्री, ज्येष्ठ विधिज्ज्ञ राम जेठमलानी यांचे प्रदीर्घ आजाराने दिल्लीतील राहत्या घरी निधन झाले. गेल्या दोन आठवड्यापासून ते आजारी होते. देशातील सर्वोत्कृष्ट विधीतज्ज्ञांमध्ये त्यांची गणना होती. राम जेठमलानी यांनी अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तानपासून ते योगगुरु रामदेव बाबा पर्यंत अनेक हाय प्रोफाईल खटले लढले आहेत.

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या मारेकऱ्यांचा खटला जेठमलानी यांनी लढवला होता. तसेच माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी बचाव पक्षाचे वकील या नात्याने ते मद्रास हायकोर्टात 2011 मध्ये लढले होते. शेअर बाजार घोटाळा प्रकरणी हर्षद मेहता यांची बाजू त्यांनी कोर्टात मांडली होती. संसदेवर हल्ला करणाऱ्या अफझल गुरुच्या फाशीच्या प्रकरणात देखील त्यांनी बचाव केला होता. बहुचर्चित जेसिकालाल हत्याकांड प्रकरणातही त्यांनी मनु शर्माची बाजू लढवली होती.

जेठमलानी यांनी चारा घोटाळा प्रकरणातील आरोपी लालूप्रसाद यादव यांचा खटला लढवला होता. तसेच सोहराबुद्दीन चकमक प्रकरणात त्यांनी अमित शहा यांचा खटला लढवला होता. जेठमलानी यांचे नाव गुन्हेगारांचे वकील म्हणून घेतले जाते. कारण जेठमलानी यांनी अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तान याचा खटला लढला आहे. हाजी मस्तानचा खटला लढवल्याने ते गुन्हेगारांचे वकील म्हणून त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली होती.

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांच्या बाजूने त्यांनी खटला लढवला होता. जयललिता यांचे ते या प्रकरणात वकील होते. तर टू-जी स्पेक्ट्रम प्रकरणात डीएमकेच्या नेत्या कनिमोळी यांचा खटला त्यांनी लढवला होता. बेकायदेशीर तेल खनन प्रकरणात बी.एस. येडियुरप्पा यांचा खटल्यामध्ये त्यांनी काम पाहिले होते. रामलीला मैदान प्रकरणात जेठमलानी रामदेव बाबांचे वकील होते. त्याच प्रमाणे जोधपूर बलात्कार प्रकरणातील आसाराम, सेबी प्रकरणातील सुब्रतो रॉय यांचे खटले जेठमलानी यांनी लढवले.