‘कोरोना’बाधित महिलेच्या मृतदेहावरील दागिने लंपास

गोंदियाः पोलीसनामा ऑनलाईन – कोरोनाने मृत पावलेल्या गर्भवती महिलेच्या मृतदेहावरील दागिने लंपास (jewelry-missing-from-corona-infected-woman-body) केल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या (gondia-district) अर्जुनी मोरगांव येथे समोर आली आहे. या घटनेने आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. त्या महिलेच्या मृत्यूपश्चात अंगावरील सोन्याचे दागिने परत केले नसून हे दागिने परत करा, अशी मागणी बाधित महिलेच्या पतीने जिल्हाधिकाऱ्यांना लेखी पत्राद्वारे केल्याने ही बाब उघड झाली आहे.

अर्जुनी मोरगाव येथील एक गर्भवती महिला 15 ऑक्टोबरला स्थानिक ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी गेली होती. त्या महिलेची कोरोना रॅपिड चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. तिला पुढील उपचारासाठी गोंदियाला पाठविले होते. मात्र, त्यादरम्यानच तिचा मृत्यू झाला, मृत्यूपश्चात पुन्हा या महिलेची कोरोना चाचणी केली. त्यातही सदर महिला पॉझिटिव्ह आली होती. ती मृत महिला कोरोनाबाधित असल्याची खात्री झाल्याने प्रशासनाने अंत्यसंस्काराची तयारी केली.

डॉक्टरांनी नगरपंचायत प्रशासनाला कळविले असता तीन कर्मचारी आले व त्यांनी मृतदेह पॉलिथिनमध्ये गुंडाळत अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तलावात मृतदेह जाळला. यावेळी मृत महिलेचे पती आणि नातेवाईक सुद्धा उपस्थित होते. काही दिवसांनी मृत महिलेच्या पतीला दागिन्यांची आठवण झाली. त्यांनी दागिन्यांविषयी नगरपंचायतमध्ये चौकशी केली. मात्र, त्यांनी नकार दर्शवत ग्रामीण रुग्णालयात चौकशी करण्यास सांगितले. ग्रामीण रुग्णालयाने मृतदेह नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी पॉलिथिनमध्ये गुंडाळल्याचे सांगून परत पाठविले. दरम्यान, आता माझ्या पत्नीच्या मृतदेहावरील चार ग्राम सोन्याचे मंगळसूत्र गेले कुठे, अशी तक्रार मृत महिलेच्या पतीने जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांना लेखी पत्राद्वारे केली असून पुढील चौकशीत संपूर्ण प्रकार उघड होणार आहे.