27 मार्चला मतदान पण तरीही 82 वर्षीय महिलेने दिलंय पहिलं मत; जाणून घ्या कसं…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   देशातील चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशामध्ये निवडणूक होत आहे. त्यानुसार, पश्चिम बंगालमध्ये 27 मार्चला पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच एका 82 वर्षीय बसंती नावाच्या वृद्ध महिलेने पहिले मत दिले आहे. बसंती यांच्यासह प्रभागातील इतर 6 जणांनी मतदान केले आहे.

निवडणूक आयोगाने नियोजित तारखेत मतदान घेणे गरजेचे असते. पण मतदानाचा पहिला टप्पा 27 मार्चला सुरु होत असताना त्यापूर्वी मतदान केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे त्यांनी केलेले मतदान हे वैध असल्याचे खुद्द निवडणूक आयोगानेच स्पष्ट केले आहे. झारग्राम येथील ही महिला रहिवासी आहे. निवडणूक आयोगाने यावेळी 80 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या किंवा गंभीर आजारी असलेल्या मतदारांना घरातच पोस्टल बॅलेटच्या माध्यमातून मतदान करण्याचा पर्याय दिला आहे. या नियमांतर्गत झारग्रामच्या 7 वृद्धांनी मतदानाचा हक्क बजावला.

कोणालाही नव्हती खोलीत जायची परवानगी

बसंती यांनी जेव्हा मतदान केले त्यावेळी त्यांच्या खोलीत कुटुंबातील कोणत्याही सदस्याला जाण्याची परवानगी दिली गेली नाही. त्यांनी बॅलेट पेपरच्या माध्यमातून मतदान केले. हा कागद सीलबंद करण्यात आला. तसेच याचे पूर्ण व्हिडिओग्राफीही करण्यात आल्याचे सांगितले.

पाच हजार वृद्ध करणार मतदान

झारग्राम जिल्ह्यातील विधानसभेच्या चार जागांसाठी 27 मार्चला पहिल्या टप्प्यात मतदान होत आहे. यामध्ये निवडणूक आयोगाचे 86 पथके पुढील आठवड्यात 80 पेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांच्या घरी जाऊन मतदान घेणार आहे. एकट्या झारग्राम जिल्ह्यात सुमारे 5715 वृद्ध मतदार असल्याचे सांगितले जात आहे.