मुलीच्या पोटात दुखू लागलं, डॉक्टरांनी केलं ‘ऑपरेशन’ तर निघाला 7 KG चा केसांचा ‘गोळा’ !

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : झारखंडच्या बोकारो जिल्ह्यात एक अनोखी घटना समोर आली आहे जिथे 17 वर्षीय मुलीच्या पोटातून ऑपरेशन करून 7 किलो केसांचा गोळा काढण्यात आला. सर्जन डॉक्टर जीएन साहू यांनी सांगितले की यशस्वीरित्या केसांचा गोळा काढण्यात आला आहे. हे एक अतिशय गुंतागुंतीचे ऑपरेशन होते कारण केसांच्या गोळ्याने पोटाच्या संपूर्ण भागावर ताबा घेतला होता.

डॉ साहू यांच्या म्हणण्यानुसार, पोटातून केसांचा गोळा मिळण्याची गोष्ट देखील विचित्र आहे. त्यांनी सांगितले की 17 वर्षीय स्वीटी कुमारीला लहानपणापासूनच केस खाण्याची सवय होती. ती नेहमीच तिचे केस गळल्यानंतर त्यांना खात असे. गेल्या पाच वर्षांपासून तिने ही वाईट सवय सोडून दिली होती, परंतु पोटात गेलेले केस एकाच ठिकाणी गोळा झाले होते. हळू हळू त्यांचा एक गोळा तयार झाला आणि त्याने संपूर्ण पोट व्यापले.

बोकारो येथील एका खासगी रुग्णालयात ऑपरेशन झाले. सर्जन डॉक्टर जीएन साहू म्हणाले की केसांचा गोळा काढण्यासाठी 6 तास लागले. यासह, डॉ साहू म्हणाले की, 40 वर्षांच्या कारकीर्दीत पहिल्यांदाच पोटात इतक्या जास्त प्रमाणात केस जमा झाल्याची घटना त्यांनी पाहिली. मिळालेल्या माहितीनुसार, मुलगी तीन दिवसांपूर्वी बीजीएचचे सेवानिवृत्त सर्जन डॉ. जीएन साहू यांना भेटली. डॉ. साहू यांनी पाहिल्यानंतर तिचे अल्ट्रासाऊंड केले. यामध्ये तिच्या पोटात ट्यूमर असल्याचा संशय त्यांना आला. सोमवारी या मुलीचे ऑपरेशन एका खासगी रुग्णालयात करण्यात आले.

यात ऑपरेशन दरम्यान तिच्या पोटातून केसांचा एक गोळा मिळाला. त्याचे वजन सुमारे सात किलोग्रॅम आहे असे सांगितले जात आहे. डॉ बीएन साहू यांच्या म्हणण्यानुसार आता मुलगी तंदुरुस्त आहे. दोन ते तीन दिवसांत हॉस्पिटलमधून तिला सोडण्यात येईल.