198 रुपये रोज मिळणार्‍या मनरेगा मजुरांला मिळाली 3.5 कोटी रुपयांची GST ची नोटीस,अटकेसाठी पोहोचले पोलिस आणि त्यानंतर…

पोलीसनामा ऑनलाईन : झारखंडच्या सिंहभूम जिल्ह्यातून एक आश्चर्यकारक प्रकरण समोर आले आहे. जिल्ह्यातील रायपहाडी गावात मनरेगा अंतर्गत रोज 198 रुपये कमावणाऱ्या एका मजुरास साडेतीन कोटी रुपयांची जीएसटी नोटीस मिळाली आहे. रोज 198. रुपये कमावणाऱ्या मजुराचे नाव लाडुन मुर्मू असे आहे. लाडुन मुर्मू यांना जेव्हा हे कळले तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले.

दरम्यान, 48 वर्षीय लाडुन मुर्मूचे नाव एमएस स्टीलचे संचालक म्हणून नोंदवले होते. 5.58 कोटीच्या व्यवहारात साडेतीन कोटींचा जीएसटी चोरल्याचा आरोप लाडुन यांच्यावर होता. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांना असे आढळले की, कोणीतरी त्यांच्या पेनकार्ड आणि आधार कार्डचा गैरवापर केला आहे. ज्यामुळे त्यांना हा त्रास सहन करावा लागत आहे.

जमशेदपूरचे पोलिस अधीक्षक डॉ. एम. तमिळ वानन यांनी सांगितले की, लाडुनच्या पॅनकार्डचा वापर करून एक बनावट कंपनी तयार केली गेली आहे. विशेष पथकास या प्रकरणाची संपूर्ण माहिती देण्यात आली असून तपास सुरू केला आहे. लाडुन यांना अटक करण्यासाठी आलेल्या पोलिसांना ग्रामस्थांच्या विरोधाचा सामना करावा लागला. त्यानंतर पोलिसांनी लाडुनला सोडुन खोट्या फसव्याचा शोध सुरू केला आहे.