झारखंडच्या जंगलात नक्षलवाद्यांकडून IED चा स्फोट; 3 जवान शहीद, 2 जखमी

रांची : वृत्तसंस्था – झारखंडच्या जंगलात आज (गुरुवार) आयईडीचा (IED) स्फोट झाला. यामध्ये सुरक्षा दलातील तीन जवानांना वीरमरण आले. तर दोन जवान गंभीर जखमी झाले आहेत. हा स्फोट झारखंडच्या पश्चिम सिंहभूम जिल्ह्यातील जंगलात झाला. यामध्ये जखमी झालेल्या जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे.

याबाबत झारखंड पोलिसांनी सांगितले, की झझारा क्षेत्रात नक्षलवाद्यांनी IED चा स्फोट घडवून आणला होता. यामध्ये झारखंड जगुआर युनिटचे 3 जवान शहीद झाले. इतर 3 जवान जखमी झाले आहेत. या स्फोटानंतर तपास सुरु केला गेला आहे. झारखंड पोलिसांचे विशेष युनिट जगुआरचे जवान पश्चिम सिंहभूम जिल्ह्यात होयाहातू गावात गस्तीवर होते. सकाळी पावणेनऊच्या सुमारास IED चा मोठा स्फोट झाला. ज्यामध्ये झारखंड जगुआरचे 3 जवान शहीद झाले आहेत.

दरम्यान, झारखंड जगुआरचा एक इतर जवान आणि केंद्रीय राखीव पोलिस दलातील (CRPF) जवान यामध्ये जखमी झाला आहे. या स्फोटाची माहिती मिळाल्यानंतर झारखंड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या झारखंड पोलिस आणि सीआरपीएफकडून नक्षलवाद्यांविरोधात अभियान सुरु केले जात आहे.