बुलेट ट्रेनसाठी १ इंचदेखील जमीन देणार नाही : मेवाणी

वसई : पोलीसनामा ऑनलाइन – गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी हे वसईत आयोजित पर्यावरण संवर्धन मेळाव्याला आले होते. यावेळी त्यांनी बुलेट ट्रेनला विरोध करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. बुलेट ट्रेनसाठी १ इंचदेखील जमीन देणार नाही, असा इशारा मेवाणी यांनी दिला.

वसईत नव्याने विकसित होणाऱ्या बुलेट ट्रेन व मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने आखलेल्या विकास आराखड्याच्या प्रकल्पाला हजारो ग्रामस्थांनी विरोध केला आहे. या प्रकल्पामुळे स्थानिक उद्ध्वस्त होणार आहेत. याबाबत माहिती देण्यासाठी पर्यावरण संवर्धन समिती तर्फे पर्यावरण संवर्धन मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी, भूमीसेना संस्थापक काळूराम धोदडे, फा.फ्रान्सिस दिब्रिटो, नगररचनाकार चंद्रशेखरप्रभू , समीर वर्तक इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी जिग्नेश मेवाणी म्हणाले, जो काही विकास होत आहे किंवा होणार आहे तो उद्योगपतींना गृहीत धरून केला जात असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. मोदी हे झूठ के शहंशहा असून सर्व ऑस्कर त्यांनाच द्यावेत ते खरे नटसम्राट आहेत. देशातील ८० कोटी लोक २० रुपयांपेक्षा कमी कमवतात. ४० कोटी पेक्षा जास्त झोपड्या आणि बेघर आहेत. मग बुलेट ट्रेन मध्ये बसणार कोण. मोदींनी देशातील हिंदूंवर खऱ्या अर्थाने अन्याय केला आहे, असे ते म्हणाले.

देशात हिंदू धोक्यात असल्याची आवई उठविली जात आहे, मात्र देशातील संविधान धोक्यात आहे. महाराष्ट्रशी माझे नाते शिवराय आणि भीमरायांचे आहे, मला कितीही विरोध करा मी महाराष्ट्रात येत राहणारच. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा १२५ कोटी खर्च करून पुतळा उभारण्याची घोषणा मोदी यांनी केली होती. मात्र आम्हाला पुतळा नको, त्याऐवजी ग्रंथालय आणि रुग्णालय उभारा असेही मेवाणी म्हणाले.