शालीमार एक्सप्रेसमध्ये स्फोटके प्रकरण ; दोघांना अटक, कट पुर्ववैमनस्यातून

मुंबई : वृत्तसंस्था – लोकमान्य टिळक टर्मिनसमध्ये आलेल्या शालीमार एक्सप्रेसमध्ये सापडलेल्या जिलेटीनच्या कांड्यांमुळे खळबळ उडाली होती. मात्र मुंबई पोलिसांनी व सुरक्षा दलांनी याचा तपास केल्यानंतर मात्र वेगळेच निष्पन्न झाले आहे. हा प्रकार एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक करावी म्हणून कट आखल्याचे समोर आले आहे. अशी माहिती पोलीस उपायुक्त मंजूनाथ शिंगे यांनी दिली. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

हावडा लोकमान्य टिळक शालीमार एक्सप्रेस गाडी सकाळी दोन तास उशीरा म्हणजे सकाळी साडेआठच्या सुमारास पोहोचली. त्यावेळी रेल्वेतील सर्व प्रवासी खाली उतरले. त्यानंतर सकाळी साडेनऊच्या सुमारास ही गाडी कारशेडमध्ये दाखल झाली. सफाई कर्मचारी सफाईसाठी गेले. तेव्हा या गाडीत कर्मचाऱ्यांना एका बॅगमध्ये जिलेटिनच्या पाच कांड्या आढळल्या. त्यांनी तातडीने आरपीएफला कळवलं. तसेच पोलिसांना पाचारण करण्यात आले. मुंबई पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. डॉग स्कॉड आणि बॉम्ब शोधक नाशक पथक घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी स्फोटके निकामी केली. त्यानंतर संपुर्ण लोकमान्य टर्मिनसचा परिसर रिकामा करण्यात आला आहे.

दुपारी बारा वाजल्यापासून पोलिसांचे सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांना तेथे एक धमकी देणारी चिठ्ठी देखील मिळाली होती. परंतु पोलिसांनी याचा तपास सुरु केल्यावर मात्र वेगळीच बाब पुढे आली. पोलिसांनी बुलढाण्यातून एकाला अटक केली आहे. त्याच्याकडे तपास केल्यावर त्याने पुर्ववैमनस्यातून एकाला अडकविण्यासाठी हा कट रचल्याचे समोर आले आहे.