आश्चर्यम् ! इतिहासात प्रथमच ‘सोफिया’ रोबोचे  प्रसिद्ध अभिनेत्यासोबत सिंगिंग 

सौदी अरेबिया : वृत्तसंस्था – सोफीया या सौदी अरेबियाचे नागरिकत्व मिळावलेल्या ‘सोफिया’ या रोबोने न्यूयॉर्कमधील एका टीव्ही शोमध्ये अनोखी करामत करुन दाखवली. तिने एका प्रसिद्ध अभिनेत्यासोबत गाणे गायले. जिमी फॉलन याने होस्ट केलेल्या ‘द टुनाईट शो जिमी फॉलन’ या न्यूयॉर्कमधील एका टीव्ही शोमध्ये सोफीयाने ही कला सादर केली. सोफीयाने ‘से समथिंग’ हे एक रोमॅंटीक ड्युएट गाणे गायले. अशाप्रकारे रोबोटने गाणे गाण्याची ही पहिलीच वेळ होती. सर्व वाद्यवृंदासोबत तिने अतिशय चांगले गाणे गायले.

तिच्या गाण्याने उपस्थितांची मने तर जिंकली.  यामध्ये तिने तिची लहान बहीण असलेल्या लिटील सोफीयाचीही ओळख करुन दिली. या कार्यक्रमात इतरही काही रोबोट सहभागी झाले होते.  एवढेच नव्हे तर तिला विचारण्यात आलेल्या प्रश्नांचीही तिने अतिशय नेमकी उत्तरे दिल्याने कार्यक्रमाला उपस्थित असणारे लोक चकीत होत होते. एका देशाचे पूर्ण नागरिकत्व मिळविणारी ‘सोफिया’ ही जगातील पहिली आणि सध्या एकमेव मानवीय रोबो आहे.

सोफिया विषयी 

सोफिया ही व्यक्ती नसून ती रोबॉटिक्सची किमया आहे. हाँगकाँगच्या हॅनसन रोबॉटिक्स या कंपनीने सोफिया रोबो तयार केला होता. या रोबोचं प्रात्यक्षिक सादर झालं तेव्हा सोफियानं सर्व प्रेक्षकांना इंग्रजीमध्ये साद घातली. सोफिया रोबोची लोकप्रियता सौदी अरेबियात मोठी आहे. 25 ऑक्टोबरला फ्युचर इन्व्हेसमेंट इनिशिएटिव्हच्यावेळी शेकडो डेलिगेट्ससमोर तिला सौदीचं नागरिकत्व प्रदान केलं.

यंत्रमानवाला नागरिकत्त्व देणारा सौदी अरेबिया हा पहिलाच देश असल्यानं याची खूपच चर्चा झाली होती.सोफियाचे फोटो आणि व्हीडिओ सोशल मीडियावर पसरू लागताच स्त्रियांपेक्षा रोबोला जास्त अधिकार कसे काय मिळतात असा प्रश्न विचारला जाऊ लागला.एखाद्या रोबोला देशाचं नागरिकत्व मिळणं हे ऐतिहासिक आहे. सौदी अरेबियातील नागरिकांनी  #Robot_with_Saudi_nationality हा हॅशटॅग वापरून या घटनेचं स्वागत केले होते.

सोफियाचा मेंदू आधीपासूनचं प्रोग्राम्ड नाही. सोफियाचा मेंदू एका साध्या वायफाय कनेक्शनवर चालतो. यात अनेक प्रकारच्या शब्दसंग्रहाची एक भली मोठी यादी आहे. सोफिया मशीन लर्निंगचा वापर करते. ती माणसांच्या चेहऱ्यावरचे हावभाव वाचून त्याला उत्तर देते. सोफियामध्ये संवेदना नाहीत. पण, येत्या काही वर्षांत ते ही होईल, असं मत कंपनीच्या डेव्हिड हँसन यांनी व्यक्त केलं आहे.