….म्हणून शेतकऱ्यांनी स्वतःच्या रक्ताने PM मोदींना लिहिलं पत्र

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नवी दिल्ली येथे गेल्या ३ महिन्यांपासून नव्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. या कायद्यावरून आंदोलक आणि सरकारमध्ये अनेक वेळा बैठक झाली पण तरीसुद्धा शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. आंदोलक शेतकऱ्यांकडून सरकारचं आपल्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी शक्य ते प्रयत्न करण्यात येत आहेत. याच दरम्यान काही आंदोलक शेतकऱ्यांनी आपल्या रक्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रामध्ये संबंधित कायदे मागे घेण्याची आणि एमएसपी (MSP) लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे.

केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी जींद येथील टोल नाक्याजवळ इंजेक्शनद्वारे रक्त काढून पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलं आहे. आंदोलक शेतकऱ्यांकडून पंतप्रधान मोदींना रक्ताने लिहिलेल्या पत्रात “आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, आम्हाला हे तीनही काळे कायदे नको आहेत. हे तीन काळे कायदे परत घ्या आणि एमएसपीवर कायमस्वरुपी कायदा करा.” अशी मागणी करण्यात आली आहे.

“जींद टोल नाका येथे आंदोलन करणारे शेतकरी म्हणाले कि, गेल्या ६३ दिवसांहून अधिक काळ आम्ही कृषी कायद्याविरोधात आंदोलन करत आहेत. असं असलं तरी अद्याप कोणतीही सुनावणी झालेली नाही” त्यामुळेच तरुण शेतकऱ्यांकडून आपल्या रक्ताने पंतप्रधानांना पत्र लिहिण्याचा निर्णय घेण्यात आला.रक्ताने पत्र लिहिणाऱ्या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, जे शेतकरी गांधीवादी पद्धतीने आंदोलन करत आहेत. त्या शेतकऱ्यांना भगतसिंगांसारखं रक्तही देता येतं.

शेतकरी नेते विजेंदर सिंधू म्हणाले कि केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकलं पाहिजे. तसेच हरियाणा, पंजाब आणि उत्तर प्रदेशासह देशातील अनेक राज्यातील शेतकरी केंद्र सरकारने पारित केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात गेल्या अनेक महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. हे नवे कृषी कायदे कोणत्याही परिस्थितीत मागे घेण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

शेतकऱ्यांच्या या आंदोलनाचा सर्वाधिक फटका हा भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम रिलायन्स जिओला बसला आहे. शेतकरी आंदोलनामुळे पंजाब आणि हरियाणात रिलायन्स जिओला मोठे नुकसान सहन करावे लागले होते. टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार ही माहिती समोर आली आहे. ट्रायकडून देण्यात आलेल्या डेटानुसार, डिसेंबर २०२० मध्ये फक्त पंजाब आणि हरियाणा या दोन राज्यांत रिलायन्स जिओच्या ग्राहक संख्येत मोठी घट झाल्याचे पाहायला मिळाले आहे. नोव्हेंबर २०२० मध्ये पंजाबमध्ये जिओचे १. ४० कोटी युजर्स होते. तर डिसेंबरच्या शेवटी ही संख्या १.२५ कोटींवर आली होती. या शेतकरी आंदोलनामुळे रिलायन्स जिओला मोठा फटका बसला आहे.