राष्ट्रवादीच्या आव्हाडांनी आपल्याच गृहमंत्र्यांना धरलं ‘धारे’वर, पोलिसांविरुद्ध व्यक्त केला ‘संताप’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन : राज्यात महाविकास आघाडीने सरकार स्थापन केले असून राष्ट्रवादीकडे गृहखाते आले आहे. दरम्यान गृहखाते राष्ट्रवादीकडे असूनही पोलिसांच्या भूमिकेत काही बदल झाला नाही. त्यामुळे मंत्र्यांमध्ये नाराजी असल्याचे उघड झाले आहे. दरम्यान पुण्यात महात्मा गांधी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्या कार्यक्रमात तुषार गांधी यांना भाषण करू देण्यात आले नव्हते. या संदर्भात जितेंद्र आव्हाड यांनी थेट ट्विटरवरूनट आपली नाराजी व्यक्त केली आहे. तसेच ते म्हणाले की पोलिसांची भूमिका अत्यंत चुकीची आणि दुर्दैवी असून त्याविरुद्ध मी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी चर्चा केली आहे असे त्यांनी सांगितले. एकूणच काय तर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्येच संवाद नसल्याचं यातून स्पष्ट होताना दिसत आहे.

दरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले की अनिल देशमुख हे लवकरच तुषार गांधी यांच्याशी बोलणार आहेत. पुण्यात तुषार गांधी यांचं भाषण मॉडर्न कॉलेजमध्ये आयोजित करण्यात आलं होतं. मात्र या भाषणाला कायदा आणि सुव्यवस्थेच्या कारणांवरून पुणे पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली आणि त्यातूनच हा वाद निर्माण झाला असल्याचे समजले. कोरेगाव भीमा प्रकरणी देखील पोलिसांच्या भूमिकेबाबत शरद पवारांनी चौकशीची मागणी केली होती. परंतु अजून गृह खात्याने याकडे लक्ष दिलेले नाही, त्यामुळे राज्यातील गृह खात्याच्या कारभारावर आणि पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

पोलिसांच्या भूमिकेवर काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनीही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तुषार गांधींच्या भाषणावर आक्षेप घेण्यात आले याबद्दल गृहमंत्र्यांनी दखल घ्यावी असे ते म्हणाले. तसेच गेल्या काही काळात अधिकारी देखील कार्यकर्त्यासारखेच वागत आहेत अशी टीका देखील त्यांनी केली.