कागदपत्रे चोरणारा चौकीदार तर नाहीना : जितेंद्र आव्हाड 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राफेल करारासंदर्भातील महत्त्वाची कागदपत्रे चोरीला गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महाअधिवक्ता के.के. वेणुगोपाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु असताना ही माहिती दिली. मोदी सरकारला सर्वोच्च न्यायालयाने क्लीन चिट दिली होती. मात्र त्यावर दखल केलेल्या पुनर्विचार याचिकेवर सर्वोच्च न्ययालयात सुनावणी सुरु आहे. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

राफेल सारख्या महत्त्वाच्या कराराचे कागदपत्र चोरीला कसे जाऊ शकतात, अशी टीका विरोधकांकडून होत आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या फेसबुक अकाऊंवरून व्हीडिओ शेअर करत सरकारवर यावरून निशाणा साधला आहे. आव्हाड यांनी तसं ट्विटही केले आहे. चौकीदार दक्ष असताना राफेलची कागदपत्रे चोरीला गेलीच कशी ?, असा सवाल आव्हाडांनी केला आहे.

देशाच्या संरक्षण गोपनीयतेचा भंग होतो म्हणून ज्या राफेल व्यवहाराची कागदपत्रे दडवून ठेवण्यात आले होती. ती अतिमहत्वाची कागदपत्रे चोरी झाल्याचे आज सरकारने सुप्रीम कोर्टात सांगितले. काही दिवसांपूर्वी हीच कागदपत्रे देशाच्या संरक्षण सज्जतेसाठी महत्वाची असल्याकारणाने ती खुली करू शकत नाही, असे संरक्षण मंत्री आणि सरकारचे मंत्री सांगत होते. या कागदपत्रांसंबंधी प्रथम कमालीची गोपनियता आणि नंतर अक्षम्य हलगर्जी का करण्यात आली, याचे उत्तर सरकारकने द्यायला हवे, असं त्यांनी म्हटलं आहे. हा चोर चौकीदारच नाहीना, अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली आहे.

तसेचं हा चौकीदार फक्त चोर नाही, तर कामचोरही आहे, असंही त्यांनी म्हटलं. एक फाईल संभाळता येत नाहीये, आणि म्हणतात देश मजबूत हातात आहे. “अशक्य” नाही “शक्य” आहे, चौकीदार ही चोर है, हे मात्र “पक्क” आहे, असंही ट्वीट त्यांनी केले आहे.

दरम्यान, पंतप्रधान कार्यालयाने राफेल डीलमध्ये हस्तक्षेप केल्याचे वृत्त ‘द हिंदू’ वृत्तपत्रानं दिलं होतं. काही गोपनीय कागदपत्रांच्या आधारे ‘द हिंदू’नं हे वृत्त दिलं होतं. ही कागदपत्रं चोरीला गेल्याची माहिती महाधिवक्ते के. के. वेणुगोपाल यांनी सर्वोच्च न्यायालयाला दिली. त्यानंतर सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी त्यांची कानउघाडणी केली. ‘कागदपत्रं चोरीला गेल्यानंतर सरकारनं काय पावलं उचलली?,’ असा प्रश्न गोगोई यांनी महाधिवक्त्यांना विचारला. तसंच त्याचा पूर्ण तपशील आज दुपारी २ वाजता द्या, अशा सूचना सरन्यायाधीशांनी महाधिवक्त्यांना दिल्या.