व्यवहार कितीचाही असो, महाराष्ट्रात डान्सबार सुरु करू देणार नाही !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – व्यवहार कितीचाही असो, महाराष्ट्रात डान्सबार सुरु करु देणार नाही, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालयाचा लेडीज बार उघडण्याचा निर्णय अत्यंत दुर्देवी आणि मनाला यातना देणारा आहे, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हीडिओ टाकला आहे. या व्हीडिओत त्यांनी आपले मत मांडले आहे.

सामाजिक स्वास्थाला लागलेला कॅन्सर दूर करण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी आघाडी सरकारमध्ये बारबंदीचा निर्णय घेतला. या निर्णयाला आता 13 वर्षे झाली असल्याची आठवणही आव्हाड यांनी सांगितली.

घरं… दारं, संसार उद्ध्वस्त होत होती. दोष कोणाचा होता हे मला माहित नाही. पण, सामाजिक स्वास्थ खराब होत होतं. अशा परिस्थितीमध्ये बार बंद झाले. आज मात्र ते पुन्हा उघडण्याचा निर्णय झालेला आहे आणि संपूर्ण राज्य सरकारच्या हेतूपूर्वक काम केले आहे. राज्य सरकारने व्यवस्थित बाजू न मांडल्याने हा निर्णय आला आहे. निवडणुकीच्या तोंडावर बार उघडणे, हे सरकारलाही शोभणारे नाही. यामध्ये अब्जोवधी रुपयांचा व्यवहार झालेला आहे आणि हा व्यवहार सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाला कारणीभूत ठरला, असं आव्हाड यांनी म्हटलं.

जर, वकिलच भांडला नाही, वकिलाने बाजूच मांडली नाही. तर निकाल आपल्या विरोधात जाणारच होता. महाराष्ट्रातील समाजव्यवस्थेला लागलेला कॅन्सर दूर व्हावा म्हणून केलेला उपाय आज फेल ठरला आहे. परत एकदा कॅन्सरची लागण मुंबई आणि महाराष्ट्राला झाली आहे. जनतेने आता विचार करावा, हे रोखण्यासाठी काय निर्णय घ्यावा. ज्या सत्तेने जे हे बारचे दार उघडलंय; त्यांचीच दारं बंद करण्याचा निर्णय तुम्हाला आम्हाला घ्यावा लागणार, असे आव्हाड यावेळी म्हणाले.

पहा व्हीडिओ-