जितेंद्र आव्हाडांनी केली PM मोदींना विनंती, म्हणाले – ‘महाराष्ट्राकडून भीक मागतो, ऑक्सिजन पुरवा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   राज्यात सध्या मिनी लॉकडाऊन सुरु आहे. राज्यात कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. मास्क, सोशल डिस्टंसिंग, होम आयसोलेशन, क्वारंटाईन असे अनेक उपाय कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केले जात आहेत. मात्र तरी देखील दुसरीकडे कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झालेला असून, राज्य सरकारच्या वतीनं केंद्र सरकारकडं वारंवार ऑक्सिजनसाठी विनंती केली जात आहे.

दरम्यान, राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्री नेत्यांकडूनही केंद्राकडं वारंवार विंनंती केली जात असल्याचं सांगण्यात आलंय. जितेंद्र आव्हाड यांनीही नुकतंच एक अत्यंत भावनिक असं ट्विट करत पंतप्रधानांकडे राज्याला ऑक्सिजन पुरवण्याची मागणी केली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत म्हटले आहे की, “महाराष्ट्राच्या वतीनं मी भीक मागतो, की आपण ऑक्सिजनचा पुरवठा करा. सध्या जगण्यासाठीची ती गरज झाली आहे”, असं आव्हाड यांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग करत जितेंद्र आव्हाड यांनी हे ट्विट केलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखिल यासाठी गेल्या २४ तासांत पंतप्रधानांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याची माहितीही मिळत आहे. मात्र या मुद्द्यावरूनही आता पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपांना सुरूवात होणार असं दिसतंय. राज्यातील जनता मात्र या संकटात होरपळताना दिसत आहे. राज्यात सध्या ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळं केंद्र सरकारनं ऑक्सिजन उपलब्ध करून द्यावा म्हणून राज्य सरकार वारंवार विनंती करत आहे. त्यामुळं या मुद्द्यावरून केंद्र आणि राज्य सरकार आमने-सामने उभे ठाकल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यात सध्या लागणारा ऑक्सिजन आणि उपलब्ध ऑक्सिजन यात मोठी तफावत आहे. त्यात वाढती रुग्णसंख्या पाहता आगामी काही दिवसांत ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.