जितेंद्र आव्हाडांनी PM मोदींची केली थेट हिटलरशी तुलना, म्हणाले – ‘त्याने देखील स्टेडियमला स्वत:च नाव दिलं होतं’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – जगातील सर्वात मोठे असे नाव लौकीक मिळवलेल्या अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव देण्यात आले आहे. या नामांतरावरून राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीवर जोरदार टीका केली आहे. स्वातंत्र्य चळवळीतील महान नेते आणि गुजरातचे सुपुत्र सरदार पटेल यांच्या नावाने मते मागून थकल्यावर त्यांच्या नावे असलेले गुजरातमधील स्टेडियम स्वतःच्या नावावर करून घेतले. हिटलर सत्तेत आल्यानंतर त्याने देखील मोठे स्टेडियम बनवून त्याला स्वतःचे नाव दिले होते, असे ट्विट करत आव्हाड यांनी पंतप्रधान मोदी यांना टोला लगावला आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते बुधवारी (दि. 24) नरेंद्र मोदी स्टेडियमचे उद्घाटन करण्यात आले. भारत आणि इंग्लंड यांच्यात अहमदाबाद येथे होत असलेल्या तिसर्‍या कसोटी सामन्याआधी मैदानाचे नाव बदलले आहे. हे मैदान मोटेरा स्टेडियम म्हणून ओळखल जात होते. त्यानंतर त्याची पुन्हा बांधणी करण्यात आली आणि संपूर्ण परिसराचे नाव सरदार वल्लभभाई पटेल स्पोर्ट्स कॉम्पलेक्स असे केले होते. आता भारत आणि इंग्लंड यांच्यातील डे-नाइट कसोटी सामन्याआधी या कॉम्पलेक्समधील क्रिकेट स्टेडियमच नाव बदलल्याने आव्हाड यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.