तेव्हा ट्रम्पच्या कानावर ‘हे’ वाक्य पडले असावे असावे -जितेंद्र आव्हाड

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   अमेरिकेत वर्णद्वेषावरून प्रचंड हिंसाचार सुरू आहे. आंदोलकांकडून जाळपोळ करण्यात येत आहे. दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंसक झालेल्या आंदोलकांना गोळ्या घातल्या पाहिजे, असे वक्तव्य केले होते. ‘ट्रम्प यांनी भारत दौर्‍यात कानावर पडलेल्या विधानामुळे ते वक्तव्य केले असावे,’ असे म्हणत राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजपावर टीका केली आहे.

मिनियापोलीस शहरात जॉर्ज फ्लॉइड या आफ्रिकन वंशाच्या कृष्णवर्णीय व्यक्तीचा पोलिसांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला. जॉर्ज फ्लॉइड यांना अटक करताना पोलीस अधिकार्‍याने त्यांची मान गुडघ्याने दाबून धरली होती. यात त्यांचा श्वास कोंडल्यानं मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडीओ सोशल माध्यमांमध्ये व्हायरल झाल्यानंतर अमेरिकेत हिंसाचाराचा उद्रेक झाला. या हिंसाचारानंतर बोलताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आंदोलकांना गोळ्या घातल्या पाहिजे असे म्हटले. ट्रम्प यांच्या विधानावर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भाष्य केले आहे. ट्रम्प म्हणतात अमेरिकेत रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांना गोळ्या घातल्या पाहिजेत. ‘नमस्ते ट्रम्प’साठी आले होते, तेव्हा ‘गोली मारो सालों को’ कानावर पडले असावे. लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांची लोकांसाठी केलेली व्यवस्था असे अमेरिकेमध्ये म्हटले गेले तिथेच आता गोली मारो सालो को,अशा शब्दात आव्हाड यांनी ट्रम्प यांच्याबरोबर भाजपालाही टोला लगावला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपा विरूद्ध आप अशी लढत बघायला मिळाली होती. या निवडणुकीत आपने बहुमत मिळवले होेते. परंतु या निवडणकुीत प्रचाराची पातळी प्रचंड घसरलेली बघायला मिळाली. या प्रचारादरम्यान भाजपाचे नेते अनुराग ठाकूर यांनी एका सभेत हे विधान केले होते.