‘त्या’ शब्दाला विरोध म्हणजे संविधानालाच विरोध आव्हाड यांनी राज्यपालांच्या पत्रावर सोडलं टिकास्त्र

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील मंदिर खुली करण्याच्या मुद्द्यावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रावरून मोठा गदारोळ झाला होता. त्यावरून सत्ताधारी पक्षानं राज्यपालांना चांगलेच धारेवर धरले होते. तर यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनीही त्या पत्रावरून राज्यपालांबाबत नाराजी व्यक्त करत त्यांना घरचा आहेर दिला आहे. आता गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीसुद्धा राज्यपालांच्या पत्रावर टीकास्र सोडलं आहे

संविधानाचा जो ढाचा आहे, त्या संविधानातून निर्माण झालेली ही पदं आहेत. या संविधानातील एका शब्दाचा आधार घेत पत्र लिहायचं आणि त्या शब्दाला विरोध असल्याचं दाखवायचं. त्या शब्दाला विरोध म्हणजे पूर्ण संविधानालाच विरोध करण्यासारखं आहे, असे आव्हाड म्हणाले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान सर्वांना एकत्र ठेवते. त्यात असा शब्दच्छल करणं चुकीचं होतं. आज जे काही अमित शाह बोलले ते योग्यच आहे. राष्ट्रपती किंवा राज्यपाल संविधानाचे रक्षणकर्ते आहेत, त्यांनी असं अचानकपणे म्हणणे धक्कादायक आणि घटना विरोधी होते. ज्यांना ज्यांना संविधान समजते, त्यांना राज्यपालांचं हे पत्र पटलेले नसल्याचंही आव्हाड म्हणाले.

तसेच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार नुकसानाची पाहणी करण्यासाठी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर गेले आहेत. त्यावर आव्हाड म्हणाले, शरद पवारांच्या साताऱ्यातील सभेची आज वर्षपूर्ती झाली. पवारांचा उभा जन्म हा जनसेवेसाठीच झालेला आहे. सभेदरम्यान जोरदार पाऊस पडला आणि साहेबांनी छत्री न घेता सभेला संबोधित केलं. आणि त्यामुळे त्या दिवशी राजकीय दिशा बदलून राज्याच्या राजकारणाची समिकरण बदलली.

आज परत लोकांचे अश्रू पुसण्यासाठी ते बांधावर गेले आहेत. माझ्या लोकांच्या डोळ्यात अश्रू असताना कोणताही धोका असला तरी तिथे बांधावर जाण्याचं आव्हान त्यांनी स्वीकारलं आहे. विरोधी पक्षाचा दौरा हा उपयोगी पडत असतो, काही उपयुक्त माहितीही मिळत असते. विरोधी पक्ष आणि सरकार जेव्हा एकत्र येत असतात, तेव्हा जनतेचं भलं होत असतं. ते जर दौरा करणार असतील आणि सरकारला काही सूचना करणार असतील तर त्या स्वागतार्हच आहेत.