“माफ करा ! मोहिते पाटलांवर जेवढा अन्याय केला तेवढा माझ्यावर करा”

आव्हाडांनी मागितली शरद पवारांची माफी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांचे सुपुत्र रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्यावर राष्ट्रवादीत आपल्यावर अन्याय होत असल्याचं सांगत मोहिते-पाटील समर्थकांनीही भाजप प्रवेश करण्याच्या निर्णयाला पाठिंबा दिला. त्यावर राष्ट्रावादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मोहिते-पाटलांवर उपरोधिक टीका केली आहे.

त्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मोहिते-पाटलांवर उपरोधिक टीका केली आहे. आव्हाडांनी आपल्या ट्विटरवरून आपली खंत व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांची माफी मागितली आहे. ‘शरद पवारसाहेब मला माफ करा, पण जेवढा अन्याय तुम्ही रणजित मोहिते आणि त्यांच्या पिताश्रींवर केला तेवढाच अन्याय जीतेंद्र आव्हाड आणि कुटुंबावर पण करा,’ असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला. यावरून मोहिते पाटील आणि कुटुंबियांना शरद पवारांनी दिलेल्या पदांची आठवण आव्हाडांनी करून दिली आहे.

तसंच, आव्हाडांनी एक आठवण सांगितली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन होण्याचे दिवस होते. पहिल्या दिवशी पवार साहेबांनी जवळ बोलवून घेतले आणि महाराष्ट्रातील युवकांची जबाबदारी तुला घ्यायची आहे, असे सांगितले. त्यानंतर १५ दिवसांनी मोहिते-पाटील ह्यांनी राष्ट्रवादीत येण्याचा निर्णय घेतला. त्यावर एक अट की रणजित ला युवक अध्यक्ष करा आणि तो झाला, असं म्हटलं आहे. रणजितसिंह यांच्यावर राष्ट्रावादीत अन्याय झाला म्हणून ते भाजपमध्ये प्रवेश करतात, असा त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांनी ही आठवण सांगितली आहे.

तसंच आम्हाला भरभरून दिलेत साहेब. ह्यांना तुम्ही काहीच दिले नाहीत. किती अन्याय सहन करायचा त्या पवारांनी. किती त्यांचा त्याग, अशी उपरोधिक टीकाही आव्हाडांनी केली आहे. त्यामुळे रणजितसिंह यांच्यावर कोणता अन्याय झाला यावर आव्हाडांनी लक्ष वेधले आहे.

दरम्यान, रणजितसिंह मोहिते पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात भाजप प्रवेशाची घोषणा केली. बुधवारी १२:३० ते १ च्या दरम्यान वानखेडे स्टेडियमवरच्या गरवारे क्लबमध्ये भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी माहिती मिळाली आहे.