ज्येष्ठ कामगार नेते, जितेंद्र आव्हाड यांचे सासरे डॉ. दादा सामंत यांची आत्महत्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  – कामगार आघाडीचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ कामगार नेते डॉ. दादा सामंत यांनी बोरिवली येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ते ९१ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, तीन विवाहित कन्या, जावई व नातवंडे असा परिवार आहे.  ज्येष्ठ कामगार नेते डॉ. दत्ता सामंत् यांचे ते मोठे बंधू होत. राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांचे सासरे होत.

पोलिसांनी घरात त्यांनी लिहिलेली चिठ्ठी आढळून आली आहे. त्यात कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव आणि आरोग्य विषयक समस्यांमुळे आत्महत्या करीत असल्याचे चिठ्ठीत नमूद केले आहे. दादा सामंत यांचा जन्म १९३० मध्ये झाला. ते मुंबईतील कामगार नेते आणि कामगार कायद्याचे अभ्यासक होते. डॉ. दत्ता सामंत यांची जानेवारी १९९७ मध्ये हत्या झाली. त्यानंतर ते २०११ पर्यंत कामगार आघाडी व सलंग्न युनियनचे अध्यक्ष होते.

१९८१ मध्ये दत्ता सामंत यांनी मुंबईतील गिरण्यांमध्ये संप सुरु केला. त्यावेळी दादा सामंत ग्वाल्हेर येथील मिलमध्ये नोकरी करीत होते. ती नोकरी सोडून ते दत्ता सामंत यांच्याबरोबर कामगार युनियनमध्ये सक्रीय झाले होते. १९८१ च्या अभुतपूर्व गिरणी संपानंतर मुंबईतील चित्रच बदलून गेले. त्यातूनच पुढे दत्ता सामंत यांची निर्घुण हत्या झाली तर आता दादा सामंत यांनी आत्महत्या केली.
कामगार चळवळीतील दोन भावांचा असा दुदैवी अंत झाला.

You might also like