आव्हाडांच्या बंगल्यावरील मारहाणीबद्दल CM उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय ?, गृहमंत्र्यांसोबत झाली बैठक

मुंबई: पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात एकीकडे कोरोनाने थैमान घातले असताना दुसरीकडे आपल्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड एका प्रकरणामुळे आणखी चर्चेत आले आहेत. मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत एका तरुणाला बेदम मारहाण केल्याचे प्रकरण सध्या राज्याच्या राजकारणात चांगलाच घुमतय… या प्रकरणामुळे जितेंद्र आव्हाड यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करा अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. हे प्रकरण आता जास्तच चिघळू लागले आहे. त्यामुळे आता यावर मुख्यमंत्री काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख आणि जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत बुधवारी बैठक घेतली. या बैठकीत या मारहाणीच्या प्रकरणावर सविस्तर चर्चा झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आता जितेंद्र आव्हाडांबाबत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काय आहे आव्हाड यांची प्रतिक्रिया ?

मारहाणीच्या या सर्व प्रकरणावर जितेंद्र आव्हाड म्हणाले की, माझ्या विरोधात गेली 3 वर्षे हा अभियंता नको नको त्या पोस्ट करतो आहे. मला माझे कार्यकर्ते याबाबत अनेकदा सांगायचे पण मी याकडे दुर्लक्ष केले. मी गेले २४ तास माझ्या मतदारसंघात आणि सोलापूर जिल्हयातील कामात व्यस्त आहे. या अभियंत्याला मारहाण झाल्याचा सर्व प्रकार मला सोशल मीडियाद्वारे समजला असल्याचे प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.

आव्हाडांना बडतर्फ करण्याची फडणवीसांची मागणी

देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. एखाद्या व्यक्तीला मंत्र्यांच्या सुरक्षारक्षकाने, मंत्र्यांच्या घरी नेऊन, मंत्र्यांच्या उपस्थितीत बेदम मारहाण करणे, ही अतिशय गंभीर घटना आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री जितेंद्र आव्हाड याना मंत्रिमंडळातून तत्काळ बडतर्फ करावे अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे. तसेच सामान्य माणसांवर अन्याय झाला तर त्याविरुद्ध आवाज उठवणे गैर नाही. न घाबरता प्रत्येकाला आपले मत मांडता आले पाहिजे. सोशल मीडियाचा कुणी चुकीचा वापर केला तर तक्रार करण्याचा आपला अधिकार अबाधित आहे. पण शासनकर्तेच मारहाण करीत असतील, तर कायद्याचे राज्यच अस्तित्वात राहणार नाही असा आरोप त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला आहे.

काय आहे प्रकरण ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 एप्रिल रोजी रात्री 9 वाजून 9 मिनिटांनी दिवे लावण्याचं आवाहन केलं होतं. मोदी यांनी हे आवाहन केल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या या भूमिकेवर सडकून टीका केली होती. आव्हाड यांनी आपली भूमिका ट्वीट करून प्रसिद्धही केली होती. त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर पीडित तरुणाने आव्हाड यांच्याबद्दल सोशल मीडियावर एक आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. त्यानंतर सुरक्षारक्षकांनी या तरुणाला जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर नेवून त्यांच्यासमोर अमानुष मारहाण केल्याचा आरोप या तरुणाने केला आहे. या प्रकरणी वर्तकनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे