कौतुकास्पद ! पुण्याच्या ‘या’ महिला डॉक्टरनं आधी भारतातलं पहिलं ‘कोरोना’ टेस्ट किट बनवलं, नंतर दिला बाळाला ‘जन्म’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून या रोगावर अद्याप कोणतीही लस उपलब्ध नाही. यावर उपाय शोधण्यासाठी अनेक देशातील डॉक्टरांकडून प्रयत्न केले जात आहेत. अशातच प्रसुतीसाठी अवघे काही तास उरले असतानाही आधी भारतातील पहिलं कोरोना टेस्ट शोधणाऱ्या आणि नंतर बाळाला जन्म देणाऱ्या महिला विषाणूतज्ज्ञ मिनल दाखवे-भोसले यांचे गृनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कौतूक केले आहे.

भारतातील पहिलं कोरोना टेस्ट किट जन्माला घातलं आणि नंतर स्वत:च्या बाळाला जन्म दिला असं म्हणत आव्हाड यांनी मिनल भोसले यांच्या कामाचे कौतूक केलं आहे. मायलॅब या फर्माकंपनीत संशोधन आणि विकास विभागाच्या प्रमुख म्हणून मिनल भोसले काम करतात. त्यांच्या नेतृत्वाखालील टीमनेच भारतातील पहिल्या कोरोना टेस्ट किटचा शोध लावला आहे.

मिनल भोसले यांच्या या कामगिरीला सलाम करत आव्हाड यांनी एक ट्विट केले आहे. त्यांमध्ये आव्हाड म्हणतात, त्यांनी आधी भारतातील पहिलं कोरोना टेस्ट किट जन्माला घातलं आणि नंतर स्वत:च्या बाळाला जन्म दिला. पुण्याच्या डॉ. मिनल दाखवे भोसले यांचे अनंत आभार. अशा कर्तव्यनिष्ठ माणसासमोर मान आदराने झुकते, असे आव्हड यांनी म्हटले आहे.

पुण्यातील Mylab Discovery Solutions Pvt Ltd या कंपनीने कोरोना टेस्ट किट बनवले आहे. Molecular Diagnostics क्षेत्रात या कंपनीचं काम असून अशा विविध आजारांचं निदान करण्यासाठीच्या अनेक किट्स त्यांनी यापूर्वी तयार केले आहेत. सध्या भारत जर्मनीमधून कोवीड 19 च्या टेस्ट किट मागवतो आहे. मात्र, जगभरातून या किट्सला मागणी असल्याने ते मिळविण्यात अडचणी येत आहेत. तसेच हे किट्स महाग आहेत. ही स्वदेशी किट बाहेरच्या किट्सच्या मानाने स्वस्त असल्याची माहिती मायलॅब डिस्कव्हरी सोल्युशन्सचे रणजित देसाई यांनी दिली. तसेच एका आठवड्यात 1 ते 1.5 लाख किट्स तयार करु शकतो, याची किंमत विदेशी किटपेक्षा चौपटीने स्वस्त असल्याचे त्यांनी सांगितले.

एक किटमध्ये 100 जणांची टेस्ट आणि लवकर निदान
पुण्यात तयार करण्यात आलेल्या या किटची किंमत 80 हजार रुपये आहे. या एका किटमध्ये 100 जणांची टेस्ट होऊ शकते. भारतात एक लाख लोकांमागे अतिशय कमी टेस्टिंग केलं जात असल्याचे बोलले जात आहे. आता स्वदेशी किट तयार झाल्याने त्याचा वेग वाढण्याची शक्यता आहे. जर्मनीपेक्षा या किट्सचा दर्जा अतिशय उच्च क्षमतेचा आहे. सध्या कोरोनाची लागण झाल्यानंतर सात तासानंतरच टेस्टमध्ये आढळून येते. या नव्या किटमध्ये लागण झाल्याच्या फक्त अडीच तासामध्येच त्याचं निदान करता येणार आहे.