Coronavirus : गुजरातचा मृत्युदर सांगा की ! ‘कोरोना’ रुग्णांच्या आकडेवारीवरून जितेंद्र आव्हाड संतापले

पोलीसनामा ऑनलाइन टीम – राज्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत आहेत. त्याचबरोबर आजारावर मात करून घरी परतणार्‍या रुग्णांची संख्याही मोठी आहे. विरोधी पक्षांकडून कोरोना रुग्णांच्या आकडेवारीविषयी वेळोवेळी भाष्य केले जात आहे. विरोधकांकडून दिल्या जाणार्‍या माहितीवरून जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला असून गुजरातचा मृत्युदर सांगा की! अशी मागणी त्यांनी केली आहे.

राज्यात 14 जूनपर्यंत कोरोनाबाधित संख्या 1 लाख 7 हजार 58 इतकी झाली. रविवारी दिवसभरात राज्यात 3 हजार 390 रुग्ण आढळून आले. रुग्णांच्या आकडेवारी विषयी विरोधकांकडून वेळोवेळी टीका केली जात आहे. विरोधकांच्या या टीकेवर राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी समाचार घेत संताप व्यक्त केला. महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यापासून आजपर्यंतचा 1 लाखाचा आकडा आवर्जून सांगतात. पण त्यातील 50 हजार पूर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत, हे सांगायचे आवर्जून टाळतात. हा साधा चावटपणा नाही, हा भलामोठा कट आहे. गुजरातचा मृत्युदर सांगा की !, असा सवाल आव्हाड यांनी केला आहे.

राज्यात 9 जून रोजी दिवसभरात 2 हजार 259 इतके रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर राज्यातील रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे दिसून आले होते. 10 जून रोजी राज्यात एका दिवसात 3 हजार 254 बाधित रुग्ण आढळून आले. 3 हजारांच्या सरासरीतच रुग्ण आढळून येत आहेत.