जितेंद्र आव्हाडांचा वारकरी परिषदेवर ‘निशाणा’, म्हणाले कोण ‘हभप’ ? मला माहित नाही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी समर्थ रामदास यांचा एकेरी उल्लेख केला. ते देवाला मानत नाही. त्यामुळे शरद पवार यांना धार्मिक कार्यक्रमांना बोलावू नका, असे पत्रक राष्ट्रीय वारकरी परिषदेने काढले आहे. तसेच वारकरी संप्रदायातील रामशास्त्री प्रभुणे यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार शरद पवार यांना देण्यास विरोध दर्शवण्यात आला. त्यामुळे महाराष्ट्रातील सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे. यातच आता राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी वारकरी परिषदेवर निशाणा साधला आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी वारकरी परिषदेवर निशाणा साधताना म्हटले की, हभप कोण आहेत. हे माला माहीत नाही. वारकऱ्यांचे नेते असतात, हे मला माहीत नाही. कर्मकांडाला खुले आव्हान देणारी वारकरी सांप्रदाय होता. आता हे कोण आले आहेत. जात व्यवस्था तोडण्यासाठी ही वारकरी चळवळ आहे. वारकरी हिंदू असला पाहिजे हे कोणी सांगितले. सर्व जाती धर्माचे संत का निर्माण झाले, याचा आपला अभ्यास करायला पाहिजे अशा शब्दात त्यांनी वारकरी परिषदेवर टीकास्त्र सोडले.

शरद पवारांना कार्यक्रमासाठी का बोलवता ?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देव, धर्म मानत नाहीत. त्यांनी समर्थ रामदास यांचा एकेरी उल्लेख केला आहे. त्यामुळे त्यांनी धार्मिक कार्य़क्रमांना व्याख्यानासाठी कशासाठी बोलता ? फक्त पैसा आणि प्रसिद्धिसाठी अशा लोकांना कार्यक्रमासाठी बोलवू नका, असे आवाहन निवृत्ती महाराज वक्ते यांनी पत्रकाद्वारे केले आहे. वक्ते महाराज हे राष्ट्रीय वारकरी वरिषदेचे संस्थापक आहेत.