…म्हणून UP-बिहारमधून महाराष्ट्रात मराठी मजुरांचा लोंढा येत नाही

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील वेगवेगळ्या राज्यांमधील स्थलांतरित मजुरांनी मूळ राज्यांकडे जाण्यास सुरुवात केली आहे. अनेक मजुरांचे लोंढेच्या लोंढे राष्ट्रीय महामार्गांवरुन निघाल्याचे चित्र दिसून आले आहे. त्यात उत्तर प्रदेश, बिहारसारख्या राज्यामध्ये जाणार्‍या मजुरांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर गृहविकास मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एक मराठी मजुरांचा एकही लोंढा महाराष्ट्रात चालत आलेला नाही असे नमूद करीत महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले आहे.

देशव्यापी लॉकडाउन सुरु झाल्यानंतर या कालावधीमध्ये लाखो स्थलांतरित मजूर हाताला काही काम नसल्याने स्वत:च्या राज्यात परत निघाले आहेत. हातावर पोट असणारे अनेक मजूर आपल्या राज्यांमध्ये परत जात असताना महाराष्ट्रामध्ये मात्र मराठी मजूर येत नसल्याचे निरिक्षण आव्हाड यांनी नोंदवले आहे. यासाठी त्यांनी महाराष्ट्रातील पुर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी राज्याला प्रगतीच्या मार्गावर नेल्यानेच हे चित्र दिसत असल्याचे म्हटले आहे.

आव्हाड यांनी ‘पटले तर रिट्विट करा प्लिज’ या कॅफ्शनने एका पोस्टचा स्क्रीनशॉर्ट शेअर केला आहे. या स्क्रीनशॉर्टमध्ये, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, गुजरात, राजस्थानमधून मराठी मजुरांचा एकही लोंढा महाराष्ट्रात चालत आला नाही, एकही ट्रेन, एकही बस भरुन आली नाही ? कारण यशवंतराव (चव्हाण), वसंतदादा (पाटील), सुधाकरराव (नाईक), शंकरराव (चव्हाण), शरदराव (शरद पवार), विलासराव (देशमुख) या सुसंस्कृत मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात घडलेला स्वयंपूर्ण आणि समृद्ध असलेला हा महाराष्ट्र (आहे), असा मजकूर दिसत आहे. त्यांनी शेअर केलेली ही पोस्ट प्रचंड व्हायरल झाली असून 24 तासांच्या आत 2 हजार 700 हून अधिक जणांनी ती रिट्विट केली आहे. तर 9 हजारहून अधिक जणांनी ती लाइक केली आहे.