गणेश नाईकांनीच राष्ट्रवादीची ‘वाट’ लावली

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देत भाजपमध्ये प्रवेश करण्याचे गणेश नाईक यांनी निश्चित केले आहेत. त्यांच्या भाजप प्रवेशावर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बोचरी टीका केली आहे. गणेश नाईक यांनी पक्षाची वाट लावली आहे, अशी जहरी टीका आव्हाडांनी नाईकांवर केली आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

नाईक हे पाच वर्षांत पक्ष साफ करतील आणि ऐनवेळी सोडून जातील, असं मी पक्षाला वारंवार सांगितले आहे. मात्र पक्षाने त्याकडे लक्ष दिले नाही. अखेर मी ज्याची भीती व्यक्त केली तेच झाले, असं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं आहे. तसंच त्यांनी यावेळी त्यांच्या मागील कामांवरही टीका केली. गणेश नाईक यांनी पक्षवाढीसाठी काहीही योगदान दिले नाही, असा आरोपही त्यांनी केला. तसंच राज्यात सत्ता असतानाही कल्याण-डोंबिवली, भिवंडी, मिरा-भायंदर मध्ये चांगली ताकद असतानाही राष्ट्रवादी वाढली नाही, असं त्यांनी म्हटलं.

गणेश नाईक 2014 मध्येच राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणार होते. जेव्हा शरद पवार यांचे ऑपरेशन सुरू होते. तेव्हा गणेश नाईक हे गुप्त बैठका घेण्यात गुंतले होते. त्यांच्या या हालचालींविषयी मी पक्षाला वारंवार सुचित केले. मात्र पक्षाने माझ्या सांगण्याकडे दुर्लक्ष केले. गणेश नाईक हे पाच वर्षांत पक्ष साफ करतील आणि ऐनवेळी सोडून जातील, असे मी वारंवार सांगत होतो. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले गेले. आता इथे जी फाटाफूट होत आहे त्यामागे गणेश नाईक यांचा हात असेल, असंही त्यांनी सांगितले.

दरम्यान, गणेश नाईकांच्या भाजप प्रवेशावर भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यावरही आव्हाडांनी त्यांचे मत मांडले आहे. मंदा म्हात्रे उघडपणे सांगत आहे, त्या गणेश नाईकांचे नेतृत्व स्वीकारणार नाहीत, मग आता यावर गणेश नाईकांचा स्वाभिमान कुठे गेला, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

आरोग्यविषयक वृत्त