जितेंद्रच्या प्रामाणिकतेचं सर्वत्र ‘कौतुक’, ‘हिरो’नं तब्बल 50 लाखाची शेतजमीन परत केली

पोलीसनामा ऑनलाईन टीम – शेतजमीन म्हटले की, भावाभावात किंवा बहीण भावात भांडण होणे हे काही नवीन नाही, संपत्तीच्या मोहामुळे अनेक घटना घडत असतात आणि सख्खा भाऊ पक्का वैरी होतो, असे उदाहरण आपण रोजमितीला बघतच असतो. संपत्तीमुळे नात्यांमधला दुरावा वाढतच जातो आणि यामुळे कटुता निर्माण होते.

मात्र, या सगळ्या घटनांना मध्य प्रदेश मधील बैतुल जिल्ह्यातील एका युवकाने मोडीत काढत प्रामाणिकपणा काय असतो हे कृतीतून सिद्ध करून एक आदर्श घालून दिला आहे. हा युवक पीडब्लूडी विभागात कॉम्प्युटर ऑपरेटर चे काम करत असून त्याचे नाव जितेंद्र उर्फ जगदीश भारती असे आहे.

जितेंद्र ने जुन्या आठवणींना उजाळा देत आपल्या बालपणाची कहाणी सांगितली. वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी जितेंद्र चे लग्न कुटुंबीयांनी गजपूर गावातील गंगा यादव हिच्याशी ठरवलं होतं. पूर्वीच्या काळी मुलीकडून मुलाला लग्नात हुंडा म्हणून शेतजमीन किंवा भरगोस पैसे दिले जात असत. त्यानुसार गंगाच्या कुटुंबीयांनी जितेंद्रच्या नावे १० एकर शेती करून लग्न पक्के केले होते, परंतु काही वर्षांनी गंगाच्या कुटुंबीयांनी लग्नाचा तगादा लावला असता जितेंद्रने आपले शिक्षण पूर्ण करत असल्याचे सांगत लग्नास नकार दिला.

जितेंद्रने काही कारणांमुळे लग्नास नकार दिल्याने गंगाचे लग्न कुटुंबीयांनी दुसरीकडे करून दिले आणि काही दिवसांनी जितेंद्रनेही दुसऱ्या मुलीशी लग्न करून आपला संसार थाटला. उल्लेखनीय बाब म्हणजे जितेंद्रने कुठलाही मोह न बाळगता तब्बल ४५ वर्षांनी आपल्या नावे असलेली १० एकर जमीन गंगाच्या भावाला परत केली.

आज या जमिनीची किंमत तब्बल ५० लाखाच्या घरात असताना जितेंद्रने १ रुपयाचाही मोह न बाळगता गंगाच्या कुटुंबियांना परत केली. जितेंद्रच्या या प्रामाणिकपणाची चर्चा सगळीकडे पसरली असून एक आदर्श जितेंद्र ने निर्माण केला आहे. रजिस्टार नोंदणी कार्यालयात सोमवारी दोन्ही कुटुंबातील सदस्य हजर असून आपल्या नावे असलेली जमीन कुठलाही स्वार्थ न बघता गंगाच्या कुटुंबियांना परत केली.

Visit : Policenama.com