जम्मू-काश्मीर : चकमकीत 5 दहशतवाद्यांचा ‘खात्मा’ तर 5 जवान ‘शहीद’

पोलीसनामा ऑनलाइन – जगभरात कोरोनाचा व्हायरस धुमाकूळ घालत असताना पाकिस्तानकडून जम्मू काश्मीरमध्ये कुरघोडी सुरूच आहे. उत्तर जम्मू काश्मिरच्या केरन सेक्टरमध्ये सीमेपलीकडून दहशतवादी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत ५ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. तर पाककडून झालेल्या गोळीबारात पाच जवानांना वीरमरण आले आहे.

कुपवाडातील लाइन ऑफ कंट्रोलजवळ झालेल्या चकमकीतील हिमाचल प्रदेशचे सुभेदार संजीव कुमार, उत्तराखंडचे हवालदार देवेंद्र सिंह, हिमाचल प्रदेशचे पॅरा बाळकृष्ण, उत्तराखंडचे अमित कुमार आणि राजस्थानचे छत्रपाल सिंह शहीद झाले आहेत.

लष्कराचे अधिकारी कर्नल राजेश कालिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर काश्मिरच्या केरन सेक्टरमध्ये सीमेपलीकडून दहशतवादी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते. त्यांचा हा प्रयत्न लष्काराच्या जवानांनी हाणून पाडला. यावेळी दहशतवाद्यांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली. मात्र, जवानांनी याला जोरदार प्रत्त्युतर दिले. या चकमकीदरम्यान लष्कराचा एक जवान घटनास्थळी शहीद झाला. तर चार जवान जखमी झाले, त्यांनी लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला. तर आणखी दोन जवानांचा रात्री उशिरा उपचारदरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीदरम्यान चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता.