जम्मू-काश्मीर : श्रीनगरमधील लाल चौकाच्या जवळ ‘ग्रेनेड’ हल्ला, एकजण ठार तर 15 जखमी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीरमधील श्रीनगरमधे दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा सुरक्षा दलांवर हल्ला केला आहे. श्रीनगरमधील लाल चौकात असलेल्या मार्केटमध्ये केलेल्या ग्रेनेड हल्ल्यात एका नागरिकाचा मृत्यू झाला असून 15 जण जखमी झाले आहेत. सुरक्षादलांनी संपूर्ण परिसराला घेराव घातला असून दहशतवाद्यांनी 15 दिवसांच्या अंतरात हा दुसरा हल्ला केला आहे. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून काही जणांची प्रकृती गंभीर आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी फेकलेला ग्रेनेड रस्त्याच्या कडेला पडल्याने झालेल्या स्फोटात रस्त्यावरील नागरिक मोठ्या प्रमाणात सापडले. श्रीनगरमधील हे खूप महत्वाचे आणि गर्दी असलेले ठिकाण आहे. त्यामुळे दहशतवाद्यांनी या परिसराला टार्गेट केले असल्याचे बोलले जात आहे.

हल्ल्याचे सत्र सुरूच –

29 ऑक्टोबर रोजी देखील पेट्रोलींग करणाऱ्या CRPF च्या एका दलावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यावेळी मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्यात आला होता. यावेळी या हल्ल्यात ५ विद्यार्थी देखील अडकले होते, त्यांना मोठ्या प्रयत्नानंतर वाचवण्यात लष्कराला यश आले होते.

दिवाळीआधी हल्ला –

दिवाळीच्या एक दिवस आधी म्हणजेच 26 ऑक्टोबर रोजी देखील दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर हल्ला केला होता. त्याआधी 24 ऑक्टोबर रोजी देखील ग्रेनेड हल्ला केला होता. तर 7 ऑक्टोबर रोजी केलेल्या ग्रेनेड हल्ल्यात 7 जण जखमी झाले होते.

Visit : Policenama.com