पुणे राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष टकले व विश्वस्त हिंदकेसरी योगेश दोडके यांना न्यायालयाचा दणका

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन-पुणे राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष दामोदर लक्ष्मण टकले व विश्वस्त हिंदकेसरी योगेश दोडके यांच्या विरुद्ध लाखो रुपयांच्या केलेल्या अपहाराबाबत फौजदारी खटला दाखल करा आणि त्याचा तपास करा असा आदेश पुणे येथील शिवाजीनगर न्यायालयातील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. आर. भळगट यांनी दिले आहेत.

राष्ट्रीय तालिम संघाचे अध्यक्ष दामोदर टकले, योगेश दोडके, अमोल भुतेकर, ललित भुसारे व बबिता भुसारे यांच्या विरुद्ध भादंवि कलम ४०६, ४२०, ४७६, ४६७, ४६८, ४७१,३४ अन्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने देण्यात आले आहेत.

याप्रकरणी फिर्यादी गोरखनाथ भिकुले यांच्या वतीने अॅड. प्रताप परदेशी व अॅड. मनोज पवार यांनी याबाबतची फिर्याद दाखल केली आहे. सन २०१६ मध्ये पुणे महानगरपालिकेतर्फे पुणे महापौर आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेची राष्ट्रीय तालीम संघाच्या सहकाऱ्याने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदरील स्पर्धा खराडी येथे पार पडली सदर स्पर्धेसाठी महानगरपालिकेने १ कोटी ८३ लाख ४हजार २१४ एवढा खर्च केला होता.

पुणे मनपाने १ कोटी २६ लाख ५० हजार रुपयांचा धनादेश राष्ट्रीय तालीम संघाला निधी म्हणून दिला होता. त्या रक्कमेपैकी तालीम संघाच्या विश्वस्तांनी संगनमत करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी तालीम संघाच्या कुठल्याही सभासदांना विश्वासात न घेता तसेच कुठलीही सर्वसाधारण सभा न घेता, कुठलाही ठराव न करता बेकायदेशीरपणे परस्पर आपापसात संगनमत करून बनावट बिले तयार करून लाखो रुपयांची रक्कम काढली आहे.

याबाबतची लेखी तक्रार पुणे मनपा आयुक्तांना देखील करण्यात आली होती. मात्र, तालीम संघाच्या पदाधिकाऱ्यांची, सभासदांचा व मनपाची फसवणूक केली असल्य़ाने विश्वस्तांवर कारवाईची मागणी करण्यात येत होती. सदर प्रकरण तालीम संघाचे माजी सरचिटणीस गोरखनाथ भिकुले यांनी समोर आणले आणि कारवाई करण्याची मागणी केली. परंतु कारवाई होत नसल्याने अखेर तालीम संघाच्या सभासदांनी न्यायालयात धाव घेतली.

फिर्यादीने दाखल केलेली कागदपत्रे व फिर्यादीच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद ऐकून न्यायालयाने सदर खटल्यांमध्ये गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिले आहे. त्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

जाहिरात