‘जास्तच पश्चाताप होत असेल तर तुमची ४० लोकं फाशीसाठी द्या’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पुलवामा दहशतवादी हल्यानंतर ट्विटरवर शाहिदांच्या श्रद्धांजली बरोबरच राजकीय आरोप प्रत्यारोपचे देखील सत्र  सुरु आहे. आता या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) प्राध्यापिका अमिता सिंह यांनी जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्यावर टीका केली आहे. विशेष म्हणजे त्यांच्या या ट्विटला मेहबुबा मुफ्ती यांनी तसेच पीडीपी पार्टीने उत्तर देखील दिले आहे.
काय आहे अमिता यांचे ट्विट 
अमिता सिंह यांनी ट्विट करत म्हटले आहे की, आरडीएक्सने भरलेल्या वाहनांची तपासणी करता आली नाही. कारण मुफ्ती जेव्हा मुख्यमंत्री होत्या तेव्हा त्यांनी ३ चेक बॅरियर हटवले. त्यामुळेच पुलवामा येथे भ्याड दहशतवादी हल्ला झाला असल्याचा दावा अमिता सिंह यांनी केला. जर मुफ्ती यांना पश्चात्ताप झाला असेल, तर पीडीपीने ४० शहीद जवानांच्या बदल्यात ४० लोकांना फाशीसाठी पाठवून द्यावे.

हेही वाचा – पाकिस्ताननं भारताला दिलेल्या ‘त्या’ धमकीचं ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याकडून कौतुक

अमिता सिंह यांच्या ट्विटला पीडीपी पार्टीने रिट्विट केले. पीडीपीने ट्विटमध्ये जेएनयूमधील प्राध्यापिका मुफ्ती यांच्या विरोधात स्वतःच्या मनाने आणि हास्यास्पद आरोप करत आहेत. इतकेच नव्हे तर त्या काश्मीरच्या नागरिकांना फाशी देण्याची भाषा करत आहेत. दिल्ली पोलिसांनी याची गंभीर दखल घ्यावी. त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी.असे पीडीपीने म्हटले आहे.

अमिता सिंह यांच्या ट्विटला मेहबुबा मुफ्ती यांनी उत्तर दिले. ट्विटमध्ये, शिक्षण देणारी व्यक्ती अज्ञानी आणि सैतानी कशी असु शकते ? असा सवाल मुफ्ती यांनी केला. खऱ्या अर्थाने त्या शिक्षिका आहेत का ? अशी विचारणादेखील मुफ्ती यांनी केली. काश्मीरला त्रास देण्यासाठी विचित्र कल्पना करतात. वाईट वाटते, त्या कायदा आणि नैतिकता शिकवतात.