JNU मधील विद्यार्थ्यांवरील हल्ल्याने संपूर्ण देश पुन्हा ‘भडकला’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – जेएनयु मधील विद्यार्थ्यांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचे प्रतिसाद पुणे, मुंबईसह देशभर उमटू लागले आहेत. एनआरसीचे वादळ काही वेळ शांत होत असतानाच रविवारी रात्री चेहरा झाकून जे एन युमध्ये शिरलेल्या काही गुंडांनी विद्यार्थ्यांवर जोरदार हल्ला केला. त्या विद्यार्थी प्रतिनिधी मंडळाच्या अध्यक्षासह किमान ४० विद्यार्थी जखमी झाले आहेत. याचे अंगावर काटा आणणारे व्हिडिओ वृत्त वाहिन्यांवरुन प्रसारित होण्यास सुरुवात झाली. तशी देशभरातील तरुणांमध्ये एकच चर्चेचा विषय झाला आहे. डाव्या पक्षांनी अभाविपवर आरोप केला असून अभाविपने डाव्या पक्षांवर हा हल्ला घडवून आणल्याचा आरोप केला आहे.

दरम्यान, रविवारी रात्री उशिरा एफटीआयआयच्या प्रवेशद्वारासमोर एकत्र येत विद्यार्थ्यांनी इन्कालाब जिंदाबादच्या घोषणा दिल्या. तसेच हातात मशाली पेटवून, अभाविपचा निषेध केला. या घटनेची माहिती मिळताच शहरातील काही विद्यार्थी येथे एकत्र येत होते. जेएनयुमधील विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा विरोधात एनएसयुआयतर्फे पुण्यात निर्धार सभेचे आयोजन केले आहे. तर, अभाविपच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सोमवारी सायंकाळी आंदोलन करण्यात येणार आहे.

मुंबईमध्ये गेट वे ऑफ इंडिया येथे काही विद्यार्थ्यांनी रविवारी रात्री आंदोलन केले. अलिगढ मुस्लिम युनिर्व्हसिटीमधील विद्यार्थ्यांनी कॅपसमध्ये कँडल मार्च काढला असून सोमवारी आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा केली. जामिया चे शिक्षक संघाने जेएनयुमधील घटनेचा निषेध केला आहे.

जेएनयुमधील हल्ल्याला सर्व विरोधी पक्षांनी केंद्र सरकारला जबाबदार ठरविले असून त्यांच्याच भाडोत्री गुंडांनी हा हल्ला केल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे आता हा मुद्दा देशभर पेटणार आहे. जेएनयुमधील हल्ल्याचा निषेध करण्यासाठी सोमवारी देशभरातील विद्यापीठे, महाविद्यालयांमध्ये आंदोलन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गेल्या महिन्यात सीएए वरुन संपूर्ण देश पेटला असल्याचे दिसून येत होते. त्या धुराळा काही प्रमाणात खाली बसल्यासारखे वाटत होते. असे असताना पुन्हा एकदा जेएनयुवरील या हल्ल्याने देशभरात आंदोलने, निषेध, कँडल मार्च सुरु होण्याची शक्यता आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/