JNU देशद्रोह केसच्या ‘टायमिंग’ बाबत बोलला कन्हैया कुमार, म्हणाला – ‘अशा वेळी मंजूरी दिली की सगळ्यांना सर्व समजेल’

नवी दिल्ली : वृत्त संस्था – अरविंद केजरीवाल सरकारने देशद्रोह प्रकरणात जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष कन्हैया कुमार आणि दोन व्यक्तींवर केस चालवण्यासाठी दिल्ली पोलिसांना मंजूरी दिली आहे. कन्हैया कुमार यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, माझ्यावर केस चालवण्याची परवानगी अशा वेळेला दिली आहे की, ज्यामुळे सर्वांना सर्वकाही लक्षात येईल. त्यांनी म्हटले की, बिहार विधानसभेची निवडणूक होणार आहे, मागच्या शुक्रवारी आम्ही भव्य रॅली काढली होती.

टीव्हीऐवजी संविधानवाल्या कोर्टात होणार निर्णय
कन्हैया कुमारने म्हटले की, बिहारमध्ये एनडीएचे सरकार आहे. त्या सरकारने एनपीआरविरूद्ध ठराव मंजूर केला आहे. राजकीय फायद्यासाठी हे सर्व करण्यात आले आहे. आमचे म्हणणे आहे की, यामध्ये जलदगती न्यायालयात सुनावणी व्हावी, जेणेकरून देशाला कळावे की, कशा प्रकारे देशद्रोहाच्या आरोपाचा दुरूपयोग केला जात आहे? आता टीव्हीवाल्या न्यायालयाऐवजी संविधानवाल्या न्यायालयात निर्णय होणार.

मी देशविरोधी कोणतीही घोषणा दिली नाही : कन्हैया

सीपीआयच्या तिकिटावर बेगूसराय लोकसभा मतदारसंघातून 2019 मध्ये निवडणूक लढवणारे कन्हैया कुमार यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले की, मी देशाच्या विरोधात कोणतीही घोषणा दिलेली नाही. केस चालवण्याची परवानगी अशा वेळेला दिली आहे, ज्यामुळे सर्वांना सर्वकाही समजले आहे. आम्हाला न्यायालयावर विश्वास आहे, सत्याचा विजय होईल, सत्यमेव जयते. आमच्यावर आरोप आहे की, आम्ही घोषणा देणार्‍यांना अडवले नाही. वडीलांचे मुलगा ऐकत नाही, तिथं माझं कोण ऐकणार.

90 दिवसात दाखल करायचे होते चार्जशीट : कन्हैया
कन्हैया यांनी म्हटले की, नकाब घालून लोकांनी घोषणा दिल्या, हे नकाबवाले लोक कोण होते? कायद्याची प्रक्रिया सांगते की, 90 दिवसात चार्जशीट दाखल केले पहिजे, यासाठी कालमर्यादेवर प्रश्न उपस्थित करणे योग्य ठरणार आहे. या प्रकरणात केस चालवण्याची मंजूरी देण्याचे प्रकरण 13 महिन्यापासून दिल्ली सरकारकडे प्रलंबित होते.