नोकरीच्या आमिषाने चार तरुणांना 20 लाखांना गंडविले

गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ : पोलीस अधिक्षकांकडे तक्रार

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – कृषी माल जहरमुक्त करण्याची जैविक खते व किटकनाशके उत्पादन करण्याच्या कंपनीत नोकरीस लावतो म्हणून साईनाथ घोरपडेसह अन्य ४ तरुणांची सुमारे १० लाख रूपयांची फसवणुक केली आहे. फिर्याद देण्यास गेलेल्या साईनाथ घोरपडे यांची फिर्याद घेण्यास पाथर्डी पोलिसने टाळाटाळ केली असल्याची तक्रार त्यांनी जिल्हा पोलिस प्रमुखांकडे केली आहे.

साईनाथ घोरपडे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ‘जोहारवाडी (ता. पाथर्डी ) येथील देविदास सुरेश सावंत हे माझ्या गावाजवळील असल्याने एक वर्षापासून त्यांची माझी ओळख आहे. देविदास सावंत व त्यांचे सहकारी बंडु बर्डे (रा. हनुमान टाकळी ता. पाथर्डी) व हर्षल जठार (रा. श्रीरामपूर) यांनी माझी वेळोवेळी भेट घेवून आम्ही कसे गाडीत फिरत आहोत.

जहरमुक्त जैविक खते व किटकनाशके तयार करण्याची कंपनी आहे. या कंपनीचा माल विकण्यासाठी कामगारांची नेमणुक करायची आहे. परंतू नोकरीला लागण्यासाठी तुम्हाला २ लाख व २ हजार रुपये द्यावे लागतील, असे वरील तिन्ही आरोपींनी मला वेळीवेळी फोन करुन व समक्ष भेटून सांगितले. माझ्या गावाकडे दुष्काळ असल्याने माझ्या उदरनिर्वाहासाठी मला नोकशची गरज होती.

दि. १०-८-१९१८ रोजी तिन्ही आरोपी १२ वाजता माझेकडे आले मला सांगितले, पैशाची तयारी लवकर करा, अन्यथा प्रतिमहा २९ हजार रू. महिन्याची नोकरी जाईल. त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून त्याच दिवशी मी त्यांना १ लाख ८० हजार रू. रोख दिले व उरलेले २२ हजार रू. करंजी येथे मी चालवीत असलेल्या खानावळीत दिले. त्यानंतर त्यांनी मला नोकरी लावण्याचे फोनवर सांगितले परंतू समक्ष भेटण्याचे टाळले.

माझी फसवणुक झाल्याचे माझ्या लक्षात येताच मी त्यांना ३१-३-२०१९ रोजी पैशाची मागणी केली असता मला तिनही आरोपींनी जिवे मारण्याची धमकी दिली. माझ्याप्रमाणेच परिसरातील विशाल चव्हाण, किरण ससे, महादेव औटी, व रामेश्वर आठरे या तरुणांचीही फसवणुक झाल्याने त्यांनी सुमारे १० लाख रुपयांना आम्हाला गंडा घातल्याची फिर्याद देण्यास पाथर्डी पोलिस स्टेशनला नकार दिल्याने मी जिल्हा पोलिस अधिक्षकाकडे याबाबत तक्रार केली असल्याचे साईनाथ घोरपडे यांनी आपल्या तक्रार अर्जात म्हटले आहे.