लॉकडाउनमुळं हातचं काम गेलं, सुतारानं दिवसरात्र कष्ट करून बनवली लाकडी सायकल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूच्या वाढच्या संक्रमाणामुळं लोकांच्या हातचं काम गेलं अनेकजण बेघर झाले. अर्थव्यवस्थेला देखील मोठा फटका बसला, त्यामुळं अनेकजण बेरोजगार झाले. या कोरोना संकटाच्या काळात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकांना एक आवाहन केलं होतं की सर्वांनी मिळून देशाला आत्मनिर्भर बनवूया आणि व्होकल फॉर लोकल असा संदेशही त्यांनी दिला होता. या काळात अनेक लोकांनी आपल्या कौशल्याचा उपयोग करत अनेक कठीण कामं सोपी केली आहेत. पंजाबमधील जीराकपूरचे रहिवासी, व्यवसायाने सुतारकाम करणारे धनीराम सग्गू यांनी या कठीण वेळेचा उपयोग करत एक लाकडी सायकल बनवली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेली ही लाकडी सायकल लोकांच्या पसंतीस उतरत आहे.

द बेटर इंडियाच्या माहितीनुसार, कोरोनामुळं धनीरामचा व्यवसाय बंद पडला. फर्निचर किंवा लाकडी सामानांची कोणतीही ऑर्डर मिळत नव्हती. अशावेळी सग्गूकडं असणाऱ्या काही लाकडी फळ्यांपासून आणि मोडलेल्या सायकलच्या काही भागांना एकत्र जोडून त्यांनी लाकडाची सायकल बनवण्याचा विचार केला. ही लाकडी सायकल बनवण्यामागचा उद्देश लोकांना पर्यावरणाचे महत्व पटवून देण्याचा असल्याचं सग्गूनी सांगितलं.

अशी सुरुवात केली सायकल बनवायला
धनीराम सग्गूनी त्यांच्याकडे असलेली लाकडी सामग्री एकत्र केली, आणि कोणता भाग कुठं बसवता येईल याचा आराखडा आखला. त्यानंतर त्यांनी कागदावर याचा प्लॅन बनवला. ही सायकल बनवण्यासाठी त्यांनी त्यांच्या मोडलेल्या सायकलच्या काही भागांचा वापर केला. या सायकलसाठी त्यांनी कॅनडियन वूड जोकि एकदम हलकी असते त्यामुळं त्याचा वापर केला आहे.