काळवीट शिकार प्रकरण : ‘भाईजान’ सलमानबाबत जोधपूर कोर्टाचा ‘मोठा’ निर्णय

जोधपूर : वृत्तसंस्था – बॉलिवूड अभिनेता सलमानला खोट्या प्रतिज्ञापत्र प्रकरणात जोधपूर कोर्टाने दिलासा दिला आहे. 1998 सालच्या काळवीट शिकार प्रकरणी सलमान खानने खोटे प्रतिज्ञापत्र सादर केले होते. ज्यात त्याने आपला शस्त्र बाळगण्याचा परवाना हरवल्याचे सांगितले होते. सलमान खानने खोटे प्रतिज्ञापत्र सादर केले असून त्याच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केलेली याचिका सीजेएम ग्रामीण कोर्टाचे न्यायाधीश अंकित रमन यांनी फेटाळली आहे. या प्रकरणावर मागील आठवड्यातच निर्णय राखीव ठेवण्यात आला होता.

या खटल्याप्रकरणी सलमान खानचे वकिल हस्तिमल सारस्वत यांनी कोर्टात आपली बाजू मांडताना म्हटले होते की, “खोटे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा सलमानचा कोणताही हेतू नव्हता. त्यामुळे त्याच्याविरुद्ध काही कार्यवाही करणे हे न्यायसंगत नाही.” यानंतर सीजेएम ग्रामीण कोर्टाचे न्यायाधीश अंकित रमन यांनी या प्रकरणी निर्णय देताना सलमान खानविरुद्ध केस दाखल करण्याबाबतची याचिका फेटाळली आहे.

हम साथ साथ है या सिनेमाच्या शुटींगसाठी सलमान खान 1998 साली जोधपूरला गेला होता. यावेळी सलमान खानवर काळवीट शिकार प्रकरणी तीन आणि आर्म्स अ‍ॅक्ट प्रकरणी एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. 2018 मध्येच सलमान खान आर्म्स अ‍ॅक्ट प्रकरणी निर्दोष असल्याचं सिद्ध झालं होतं. परंतु या खटल्यादरम्यान सलमान खानला आपला परवाना कोर्टात जमा करायचा होता. परंतु त्याने तसे न करता परवाना हरवल्याचे प्रतिज्ञापत्र कोर्टात सादर केले. प्रत्यक्ष पाहता सलमानने त्याचा परवाना नुतनीकरणासाठी दिला आहे अशी माहिती समोर आली. त्यामुळे सलमान खानने खोटे प्रतिज्ञापत्र सादर केल्याने त्याच्या विरोधात कारवाई केली जावी अशी मागणी 2006 सालीच करण्यात आली होती. त्याच प्रकरणी सलमान खानला जोधपूर कोर्टाने दिलासा दिला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

घरगुती उपायांनी काढा चेहऱ्यावरील नको असलेले केस

मनुष्य शरीरातील हाडांविषयी हे माहित आहे का ?

योगासनांमध्ये ‘सातत्य’ असणे फायद्याचे